खुलाशानंतर होणार निलंबन ; विधी मंडळातही गाजणार ‘भुसावळ’
भुसावळ : भुसावळातील स्वस्त धान्य वितरणात काळाबाजार होत असल्याने जिल्हाधिकार्यांनी ही बाब गांभीर्याने घेत सरप्राईज सात उपजिल्हाधिकार्यांसह 20 तहसीलदारांना एकाचवेळी शहरातील 57 दुकानांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. अधिकार्यांनी दिलेल्या अहवालात शहरातील दहा स्वस्त धान्य दुकाने बंद आढळली तर तब्बल 24 दुकाने अकार्यन्वित असल्याची व ती नियमबाह्यपणे अन्य दुकानांना जोडण्याची बाब उघड झाली तर अन्य नियमबाह्य बाबी उघड झाल्याने एकूण 23 धान्य दुकानदारांना नोटीसा बजावण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. खुलासा आल्यानंतर निलंबन व अन्य कारवाई होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना कारवाईचा अहवाल मागितला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भुसावळातील अनागोंदीवरून चांगलेच रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.