भुसावळातून एस.टी.ने 154 प्रवाशांना सोडले मध्यप्रदेश बॉर्डरवर

0

सोशल डिस्टन्सचे पालन : एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवेश

भुसावळ : परीवहन मंत्री अनिल परब यांच्या घोषणेनंतर रविवारी दुपारी भुसावळातून सात बसेसद्वारे 154 प्रवाशांना मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर चोरवड सीमेवर सोडण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जॉली पेट्रोल पंपाजवळ मजल-दरमजल करीत आलेल्या परप्रांतीय मजुरांची नाव नोंदणी करण्यात आली व नंतर सोशल डिस्टन्सचे पालन करीत एका बाकावर एक प्रवासी याप्रमाणे केवळ 22 प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात आला.

भुसावळातून पहिल्या दिवशी सात बसेस रवाना
भुसावळ आगारातून बसेस निघण्यापूर्वी त्यांचे सॅनिटायजेशन करण्यात आले तसेच कर्तव्यावरील चालक व वाहक यांना मास्कही देण्यात आले. जॉली पेट्रोल पंपाजवळ तहसील प्रशासनाकडून पायी येत असलेल्या व मध्यप्रदेशाकडे निघालेल्या मजुरांची/प्रवाशांची नाव नोंदणी करण्यात आली व नंतर त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात आला. सात बसेसच्या माध्यमातून एकूण 154 प्रवासी चोरवड सीमा नाक्यावर सोडण्यात आले व नंतर तेथून मध्यप्रदेश परीवहन विभागाच्या बसेस या प्रवाशांना इच्छितस्थळी सोडत असल्याचे समजते.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे, भुसावळ आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, स्थानक प्रमुख पी.बी.भोई, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील चौधरी, वाहतूक नियंत्रक खचाटे, झांबरे, जैस्वाल यांच्यासह तहसील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.