भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून शहरातून लांबवलेली एक दुचाकी जप्त करण्यात आली तर आरोपीच्या अटकेने शहरातील अनेक दुचाकी चोरींचा उलगडा होण्याची आशा आहे. भूषण नितीन तावडे (20, रा.कदाणे, ता.शिंदखेडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पारोळा पोलिसांनी केली अटक
पारोळा पोलिसांनी 10 रोजी रात्री ते 11 रोजीच्या मध्यरात्री नाकाबंदी लावल्यानंतर संशयीत भूषण हा चोरीच्या दुचाकीसह सापडल्याने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यास सोमवारी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने तक्रारदार व नगरपालिका कर्मचारी प्रवीण मदन चावरीया (36, पांडववाडा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यांची घराबाहेर लावलेली दुचाकी (एम.एच.30 बी.जी.7341) लांबवल्याची कबुली दिली. या प्रकरणी शहर पोलिसात दुचाकी चोरीचा 11 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी भूषण हा अट्टल असून त्याच्या अटकेने शहरातील अन्य चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास लागण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील व भूषण चौधरी करीत आहेत.