भुसावळातून लखनऊसाठी धावली ‘श्रमिक’ एक्स्प्रेस

0

भुसावळ (गणेश वाघ) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे रेल्वे व बस सेवा ठप्प झाल्याने परप्रांतीय मजुरांसह पर्यटक व अन्य नागरीक जिल्ह्यातील विविध भागात अडकले होते मात्र राज्य शासनाने दिलासा देत प्रशासनाकडे नाव नोंदणी केलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी भुसावळ येथून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता 01911 भुसावळ-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस सोडल्याने परप्रांतीय प्रवाशांना मोठा सुखद धका बसला. या प्रवाशांना निरोप देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून टाळ्यांचा कडकडाट करीत प्रवाशांचे मनोबल उंचावले.

श्रमिक एक्स्प्रेसने 1299 प्रवासी रवाना
भुसावळसह जळगाव, धुळे व बुलढाणा भागातील प्रशासनाकडे नोंदणी केलेल्या लखनऊ परीसरातील तब्बल 1299 प्रवाशांना एस.टी.बसेसद्वारे भुसावळ रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत एका बोगीत साधारणतः 54 प्रवाशांना बसवण्यात आले तर एकूण 24 डब्यांची भुसावळ-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळातून रवाना झाली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, डीआरएम विवेक कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्यासह रेल्वेच्या विविध भागातील अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

नगरसेवक कोठारींनी प्रवाशांना दिले जेवण
श्रमिक एक्स्प्रेसने लखनऊसाठी रवाना झालेल्या सर्व 1299 प्रवाशांना भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यातर्फे जेवण व बिस्कीट देण्यात आले.