भुसावळातून श्री विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना

तीन तास विलंबाने धावली विशेष गाडी : भाविकांना फराळाचे पदार्थ वाटप

भुसावळ : श्री विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल भेटीची आस लागलेले हजारो वारकरी शनिवारी दुपारी साडेचार वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेने रवाना झाले. नियोजित वेळेपेक्षा गाडीला तब्बल तीन तास विलंब झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला असलातरी विठ्ठल दर्शनाची आस लागून असलेल्या भाविकांमध्ये मात्र दोन वर्षानंतर रेल्वेने वारी करण्याची संधी मिळाल्याचे समाधानही दिसून आले. खासदार रक्षा खडसे यांनी या गाडीचे संपूर्ण बुकींग केले होते.

कोलते बंधूंनी दिली हरीरपाठाची पुस्तके
भुसावळचे माजी नगरसेवक किरण कोलते आणि रेल्वेतील कर्मचारी किशोर कोलते यांनी रेल्वे स्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी आलेल्या भाविकांना हरिपाठाचे व गुरूपरंपरेचे अभंग असलेले दोन हजार पुस्तके भाविकांना दिली. दरम्यान, शनिवारी मनमाडहून विलंबाने रॅक आल्याने दुपारी दिड वाजता सुटणारी पंढरपूर विशेष ही गाडी साडेतीनच्या सुमारास भुसावळ जंक्शनवर आली व दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर गाडी रवाना झाली.

प्रवाशांना फराळाचे पदार्थ वाटप
विशेष गाडी आल्यावर भाजपचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी गाडीत बसलेल्या भाविक प्रवाशांना पाण्याची बाटली, वेफर्स, उपवासाचा चिवडा, केळी असे खाद्य पदार्थ सोबत दिले. यावेळी भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्यात. भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे मात्र उपस्थित नव्हत्या.