भुसावळात अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये पकडले 50 लाखांचे सोने

पगार न दिल्याने नोकरानेच मारला ऐवजावर डल्ला : संयुक्त कारवाईत आरोपी जाळ्यात

Accused with stolen gold worth 50 Lakhs in The Net Of Security Agencies In Bhusawal भुसावळ : खार (मुंबईत) भागातील बड्या बांधकाम व्यावसायीकडे नोकराने 50 लाखांच्या सोन्यासह रोकड लांबवण्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. संशयीत 22564 अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे पसार होत असल्याची माहिती भुसावळातील लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला मिळाल्यानंतर रविवारी दुपारी गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर येताच संशयीताला बेड्या घालण्यात आल्या. राहुल रोशन कामत (25, मर्णेया, उमरकट, जि.मधुबनी, बिहार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत
राहुल कामत हा संशयीत मुंबईतील खारघर भागातील बांधकाम व्यावसायीक मुकेश गांधी यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता मात्र घरातील सोन्यासह रोकडवर त्याची नजर पडल्यानंतर त्याने शनिवारी मध्यरात्री घरात चोरी केली व पळ काढला. खारघर पोलिसात या प्रकरणी गांधी यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी हा बिहारकडे पसार होईल ही शक्यता गृहित धरून खारघर पोलिसांनी स्थानिक लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कळवली तसेच संशयीताचा फोटोदेखील पाठवला.

जनरल बोगीतून केली अटक
22564 अंत्योदय एक्स्प्रेस रविवारी दुपारी दोन वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर जनरल बोगीतून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 43 लाखांचे सोने, तीन लाख 84 हजारांची रोकड, महागड्या घड्याळी व फोन, फाईल्स असा सुमारे 50 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहाय्यक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, ठाकूर, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले आदींच्या पथकाने केली.