नागरीकांना दिलासा ; 15 जूनपर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित
भुसावळ- शहरात तब्बल चार वर्षांपासून नालेसफाई रखडल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती मात्र बुधवारी अखेर नालेसफाईला मुहूर्त लाभला असून 11 स्वतंत्र कामांचे कंत्राट देण्यात आल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. दैनिक जनशक्तीनेदेखील नालेसफाई रखडल्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून पालिका प्रशासन व सत्ताधार्यांचे लक्ष वेधले होते.
पंचशील नगर भागातून सुरुवात
शहरातील पंचशील नगर भागातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. प्रार्थना स्थळाकडे जाणार्या रस्त्यावरील नाल्याची दिवसभरात स्वच्छता करण्यात आली. शहरातील गौसीया नगर, पापा नगर भागातील गटारींचीदेखील स्वच्छता करण्यात आली. पालिकेने शहरातून गेलेल्या बलबल काशी नाल्यासह मुख्य नाल्यांच्या स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. 15 जूनपर्यंत संपूर्ण नाल्यांची सफाई संबंधित कंत्राटदारास करावयाची असल्याची मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले.
संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, स्थायी समितीच्या बैठकीत नालेसफाईचा विषय घेण्यात आला होता. या विषयाला मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमचे संपूर्ण कामावर बारीक लक्ष असून अनेक वर्षांपासून नालेसफाई न झाल्याने ती आता केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील सिंधी कॉलनीसह अनेक भागातील गटारींची खोलवर स्वच्छता करण्यात येत असल्याने पावसाळ्यात गटारी तुंबण्याचे प्रकार आता थांबतील.
उपनगराध्यक्षांनी केली पाहणी
उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, किशोर पाटील, लल्ला देवकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, मुख्याधिकारी बाविस्कर म्हणाले की, स्वतंत्र 11 प्रकारचे कंत्राट देण्यात आले असून साधारणतः दहा लाखांचे एक काम प्रमाणे कामे देण्यात आली आहेत.