‘दैनिक जनशक्ती’च्या वृत्ताची लोकप्रतिनिधींकडून दखल : आमदारांनी केली पाहणी : खड्डेमय रस्त्यातून लवकरच वाहनधारकांना दिलासा : काम दर्जेदार करण्याची आमदारांची सूचना
भुसावळ- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्याचे भूमिपूजनानंतही काम रखडल्याने ‘दैनिक जनशक्ती’ने शुक्रवार, 7 फेब्रुवारीच्या अंकात ‘यावल रस्त्याची भूमिपूजनानंतरही उपेक्षाच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींसह कंत्राटदाराचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल घेत बुधवारपासून प्रत्यक्षात रस्ता कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, कामाचा दर्जा चांगल्या पद्धत्तीने राखाला जाण्यासह अवजड वाहतूक अधिक असल्याने कामातील कुचराई सहन केली जाणार नाही, अशा सूचना आमदार संजय सावकारे यांनी पाहणीप्रसंगी केल्या.
‘दैनिक जनशक्ती’ने वेधले होते लक्ष
रींग रोडच्या मंजूर कामांतर्गत यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या 500 मीटर रस्ता कामाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवार, 23 जानेवारी रोजी भूमिपूजन करण्यात आले व त्यावेळी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची ग्वाहीदेखील ठेकेदाराकडून देण्यात आली होती मात्र पंधरा दिवस उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने ‘दैनिक जनशक्ती’ने वाहनधारकांच्या वेदना लक्षात घेता शुक्रवार, 7 फेब्रुवारीच्या अंकात ‘यावल रस्त्याची भूमिपूजनानंतरही उपेक्षाच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करीत लोकप्रतिनिधी व संबंधितांचे लक्ष वेधले होते. आमदार संजय सावकारे यांनी याबाबत दखल घेत बांधकाम विभागाला सुचना दिल्यानंतर बुधवारपासून या कामाला सुरूवात करण्यात आली. ामाला सुरवात झाल्यानंतर आमदार सावकारे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
दर्जेदार काम करण्याच्या सूचना
यावलरोडवरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने कामाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे, दर्जेदार रस्ता तयार करावा, यात कुठलाही कसूर न करण्याच्या सूचना आमदार संजय सावकारे यांनी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.वाय.कुरेशी यांना प्रसंगी दिल्या. अल्पावधीत हे काम पूर्ण करुन वाहनधारकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
स्मशानभुमीच्या कामाचीही पाहणी
आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा करून स्मशानभुमीसाठी विशेष निधी मंजूर केला होता. सध्या हे काम सुरू करण्यात आले आहे, या कामाचीही त्यांनी बुधवारी पाहणी केली. स्मशानभुमीचे ओटे, बसण्यासाठी व्यवस्था, दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. या कामाची पाहणी आमदारांनी पाहणी करीत सूचना केल्या.
दर्जेदार काम करण्याच्या सूचना -आमदार
यावल रस्त्यावरून अमृत योजनेची पाईप लाईन गेल्याने ती काढण्यासाठी विलंब झाल्याने रस्त्या कामाला विलंब झाला मात्र आता बुधवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. दर्जेदार काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून एका बाजूला काम सुरू असल्याने दुसर्या बाजूने होणार्या वाहतुकीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना करण्यात आल्याचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.