भुसावळात अडीच लाखांची धाडसी घरफोडी

0

बंद घरे टार्गेट ः पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी

भुसावळ : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून बंद घरांना चोरटे लक्ष करीत असल्याने नागरीकही त्रस्त झाले आहे. शहरातील गजबजलेल्या शांती नगरात चोरट्यांनी मोर्चा वळवत गावी गेलेल्या स्टेशन मास्तरांच्या घरातून सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे दागिने व 20 हजारांची रोकड लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बंद घरे चोरट्यांच्या रडारवर
रेल्वे सीवायएम कार्यालयात स्टेशन मास्तर म्हणून असलेले नमण भूषण श्रीवास्तव (52, प्लॉट नं.4, शांती नगर, भुसावळ) हे 14 रोजी खाजगी कामानिमित्त गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन तोळे वजनाचा हार, दोन तोळ्यांचे कंगण, दोन तोळ्यांचे कानातले झुमके असे 90 हजारांचे दागिने व 20 हजारांची रोकड मिळून एक लाख 10 हजारांचा ऐवजावर डल्ला मारला. 21 रोजी घराशेजारी राहणार्‍या संदीप सॅलेट यांनी श्रीवास्तव यांना घराचा दरवाजा उघड असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. सोन्याच्या दागिन्यांची किंमत आजच्या दरानुसार सुमारे सव्वा दोन लाखांपर्यंत आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घराची पाहणी केली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.

चोरी करताना संशयीताला सोडले
शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगराजवळील संकल्प अपार्टमेंटमध्ये दोन दिवसांपूर्वी चोरटे शिरल्यानंतर सतर्क नागरीकांनी मनोज विश्‍वासराव शिंदे (42, ऐंशी फुटी रोड, मनमाड जीम, धुळे) यास पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र या चोरट्यावर गुन्हा दाखल न करताच त्यास सोडून देण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे साहिल तडवी यांनी चोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर ठाणे अंमलदार रशीद तडवी यांच्या ताब्यात दिले होते. रशीद तडवी यांना विचारणा केली असता त्यांनी मनोज शिंदे हे वेडसर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून कळाल्याने त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.