भुसावळात अतिक्रमण निघताना प्रहारचे पदाधिकारी बिळात का लपले ? ; मोहिमेशी आमदारांचा संबंध नाही
भुसावळातील पत्रकार परीषदेत भाजपा पदाधिकार्यांचा दावा : अतिक्रमण निघताना प्रहारचे पदाधिकारी बिळात का लपले : युवराज लोणारींचा सवाल
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनंतर भुसावळात पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवले, असा आरोप मंगळवारी भुसावळातील ‘प्रहार’च्या पदाधिकार्यांनी केला होता. या आरोपाचे खंडण भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी केले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेशी आमदारांचा काडीमात्र संबंध नाही, तो प्रशासकीय कामाचा भाग आहे. आरोप करणारे प्रहारचे फिरोज शेख हे ‘तोडी बहाद्दर’ आहेत तर प्रकाश (खन्ना) कोळी हे दहावी नापास असताना त्यांनी नोकरी मिळवली व त्यांच्यावर त्याबाबत गुन्हा दाखल असून त्यांना आरोप करण्याचा नैतीक अधिकार नाही मात्र ज्यांनी आरोप केले आहेत त्यांचा ‘बोलविता धनी’ दुसराच आहे, त्यांनी पडद्याआड न लपता आता समोर यावे, अशी भूमिका भाजपा पदाधिकार्यांनी यावेळी मांडली. शहरातील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परीषदेचे आयोजन करीत ‘प्रहार’च्या पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करीत त्याचा निषेधही नोंदवला.
आमदारांवर आरोप करणारे ‘तोडी बहाद्दर’
आमदारांवर एकही डाग नसल्याने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ज्यांनी आरोप केले ते प्रहारचे फिरोज शेख हे तोडी बहाद्दर आहेत, त्यांनी पालिका निवडणुकीवेळी कुणाकडून काय-काय घेतले याचा आम्ही लवकरच भंडाफोड करू, असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी केला तर प्रकाश (खन्ना) कोळी हे पालिकेचे माजी कर्मचारी असून ते दहावी नापास असतानाही त्यांनी नोकरी मिळवल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून चौकशी सुरू असल्याने त्यांना आरोप करण्याचा नैतीक अधिकार अजिबात नाही, असेही लोणारी म्हणाले.
तेव्हा ‘प्रहार’चे पदाधिकारी बिळात का लपले ?
भुसावळातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवत असताना तसेच शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरू असताना प्रहार संघटनेचे पदाधिकारी बिळात का लपले ? असा परखड सवाल माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी उपस्थित केला. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे आरोप केले जात असून या आरोपाचे खंडण करण्यासाठीच पत्रकार परीषद घेण्यात आल्याचे ते म्हणाले. रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्यांसाठी पाच हजार घरकुलांचा प्रस्ताव आमदारांनी पाठवला असून लवकरच त्यांना घरकुले मिळतील, असा आशावाद लोणारी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, मूळात आमदारांकडे काही लोकांनी मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी मुद्दा मांडला मात्र पालिकेवर ‘प्रशासक राज’ असल्याने केव्हा, कधी व कुठून कशी मोहिम राबवावी हा पालिकेच्या अधिकार्यांच्या कामाचा भाग आहे त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या बाबीशी आमदारांचा काडीमात्र संबंध नाही, असेही लोणारी स्पष्ट केले.
आधी स्वतःचे अतिक्रमण हटवा !
भुसावळातील अतिक्रमण मोहिमेबाबत जे कार्यकर्त्यांकडून आरोप करवून घेत आहेत ‘त्या’ पदाधिकार्यांच्या नेत्यांनीच शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचा आरोप लोणारी यांनी केला. ते म्हणाले की, मुद्रा लोणचे पैसे खाल्ले कुणी? कुणाच्या खात्यात हा धनादेश वटला, तो युवा नेता कोण? भुसावळातील खरा खंडणीखोर कोण? हे पुराव्यानिशी आगामी काळात सिद्ध करू, असेही लोणारी म्हणाले.
आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे म्हणाले की, आमदारांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिकेत प्रशासकीय राजवट असून या काळातचही अतिक्रमण हटवण्यात आले आहे त्यामुळे सत्ता असताना कुणीही त्याबाबत ओरडही केलेली नव्हती, असेही त्यांनी सांगितले. ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तेच अतिक्रमण हटवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, पिंटू ठाकूर, राजेंद्र आवटे राजेंद्र नाटकर, शेखर इंगळे, निकी बत्रा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे, गिरीश महाजन, लक्ष्मण सोयंके, शहराध्यक्ष अनिता आंबेकर, बिसन गोहर, अनिरुद्ध कुलकर्णी, नारायण रणधीर, मुकुंदा निमसे, प्रशांत (लल्ला) देवकर, जिल्हा सरचिटणीस शैलजा नारखेडे, भारती वैष्णव आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.