भुसावळात अतिक्रमण हटवताना पालिका अधिकार्‍यांना धक्काबुक्की : एकाला अटक

भुसावळ : शहरात पालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरू असून गरूड प्लॉट भागातील अतिक्रमण हटवत असताना संशयीत राजू बाबूलाल चंदन (43, गरूड प्लॉट, भुसावळ) याने पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

अतिक्रमण हटवताना केली धक्काबुक्की
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या नेतृत्वात गुरुवार, 24 रोजी शहरातील वर्दळीच्या भागात अतिक्रमण हटवण्यात आले. गरूड प्लॉट भागातही संशयीत राजू चंदन यांनी अतिक्रमण केल्याने त्यांना पालिकेने अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस बजावली होती मात्र त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात आल्याने पालिकेचे अधिकारी व पथक कारवाईसाठी गेल्यानंतर संशयीताने अधिकार्‍यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली तसेच पथकाच्या कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी नगरपालिका अधिकारी सचिन नारखेडे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत राजू चंदनविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.