भुसावळ : शहरातील मरीमाता मंदिरामागे पालिकेच्या रीटेनिंग वॉलचा गैरवापर करून तीन अनधिकृत दुकानांचे बांधकाम अज्ञातांनी केले मात्र या संदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात मुख्याधिकार्यांनी तीन दुकानांवर बुलडोझर फिरवल्याने भुसावळातील राजकीय लोकप्रतिनिधींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले की, भुसावळ शहरातील अतिक्रमण महिनाभरानंतर हटवले जाणार असून सत्तेचा दुरुपयोग कदापि आपण खपवून घेणार नाही.
पोलिस बंदोबस्तात पाडले अवैध बांधकाम
शहरातील मरीमाता माता मंदिरामागे पालिकेचे स्वच्छतागृह बांधण्याचा नुकताच मक्ता देण्यात आला होता मात्र स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू असताना अनधिकृतरीत्या तीन दुकानांच्या बांधकामालादेखील अज्ञातांकडून सुरूवात करण्यात आली. पालिका प्रशासनाला या संदर्भात मोबाईलवर सुज्ञ नागरीकाने तक्रार केल्यानंतर मुख्याधिकार्यांनी स्वतः जागेची पाहणी केल्यानंतर अतिक्रमण आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिस बंदोबस्तात गुरुवारी जेसीबी बोलावून तीनही दुकाने तोडली. पालिकेच्या कारवाईनंतर लोकप्रतिनिधींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली तर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दुपारी दिड ते तीन वाजेदरम्यान पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अतिक्रमण हटवताना पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, नगर रचनाकार भटू पवार, रचना सहाय्यक शुभम अडकर, आरेखक महेश चौधरी, नगर अभियंता विजय तोष्णीवाल, स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार, वसंत राठोड, विद्युत अभियंता सुरज नारखेडे, लिपिक राजू नाटकर उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक धुमाळ व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
सत्तेचा दुरुपयोग खपवून घेणार नाही : मुख्याधिकारी
कारवाईनंतर पालिकेत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या मोबाईलवर अतिक्रमणासंदर्भात तक्रार आली होती व सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांकडून हे अतिक्रमण केले जात असून त्यातून लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याचे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारीच्या पडताळणीत तथ्य आढळले मात्र त्यावेळी अतिक्रमणाला केवळ सुरुवात असल्याने बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत येईस्तोवर कारवाई करायची नाही, असे ठरवले व बांधकाम स्लॅबपर्यंत येताच गुरुवारी ते बंदोबस्तात हटवण्यात आले. सुरुवातीलाच बांधकाम तोडले असतेतर संबंधित अतिक्रमण करणार्याला आर्थिक झळ बसली नसती! सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदा गाळे विकणार्यांच्या रॅकेटपर्यंत हा संदेश देण्यासाठी असे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मात्र बांधकाम नेमके कुणी केले ? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्याबाबत आपल्याकडे पुरावा नसल्याचे त्यांनी सांगिते मात्र यापुढे सत्तेचा कुणी दुरुपयोग करीत असल्यास ही बाब खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
महिनाभरात भुसावळातील अतिक्रमण हटणार
शहराच्या चौफेर बाजूला अतिक्रमण झाले असून वर्दळीच्या रस्त्यांवर टपर्या थाटण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न शहरात जटील बनला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी म्हणाले की, एका महिन्याच्या आत अतिक्रमण धारकांनी आपापल्या टपर्या तसेच अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महिनाभरानंतर अतिक्रमण हटवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, पालिकेच्या पाच विभागातील दोन पथकांतर्फे दर पंधरा दिवसांनी आता पालिकेच्या जागेवर व मालमत्तेवर केलेले अतिक्रमण हटवले जाणार आहे.
पालिकेच्या वसुली कर्मचार्यांना आदेश
भुसावळ पालिकेतील वसुली कर्मचार्यांना शहरातील ज्या-ज्या भागात बांधकामे वा अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्याची माहिती कळवण्यासंदर्भात आदेश काढत असल्याचे मुख्याधिकारी म्हणाले. वसुली कर्मचारी वसुलीनिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या निदर्शनास अवैध बांधकाम वा सुरू असलेले बांधकाम दिसल्यानंतर त्यांनी माहिती मुख्याधिकार्यांना द्यावी व त्यानंतर संबंधित विभाग त्या बांधकामाची परवानगीची चौकशी करेल व परवानगी नसल्यास अवैध बांधकाम लागलीच पाडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. सुज्ञ भुसावळकर नागरीकांनी अवैधरीत्या बांधकाम करण्यात आलेले गाळे विकत घेवू नये, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी करीत अवैध गाळेदेखील तोडले जाणार असल्याचा इशारा दिला.