नगरसेवकाच्या सतर्कतेने काम बंद ; सुपरवायझरला दंडाची नोटीस
भुसावळ- केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी अमृत योजनेचे काम शहरात अंतिम टप्प्यात असून प्रभाग क्रमांक 22 मधील नेब कॉलनी परीसरात मंगळवारी दुपारी पाईप जोडणीच्या कामासाठी थेट वीज खांबावर आकोडे टाकून वीजपुरवठा घेण्यात आल्याचा प्रकार नगरसेवक दुर्गेश ठाकूर, रवी सपकाळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काम बंद पाडत वीज कंपनीच्या अधिकार्यांसह स्थानिक बाजारपेठ पोलिसांना कळवले. दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला तर वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता पंकज वाघुळदे यांच्यासह अतिरीक्त कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेत पंचनामा केला तसेच सुपरवायझर नितीन खलसे यांच्या नावाने पाच हजार 700 रुपयांचा दंड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते तर राजकीय दबावातून मात्र गुन्हा दाखल न झाल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.