भुसावळ- केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘अमृत’ चे काम तीन वर्षानंतरही पूर्ण न झाल्याने सत्ताधार्यांविरुद्ध जनतेतून तीव्र रोष व्यक्त होत होता शिवाय या योजनेमुळे रस्त्यांची कामेदेखील करता येत नसल्याने तीव्र नाराजीदेखील वाढली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात आमदार, नगराध्यक्ष तसेच एमजीपी व जैन एरीगेशनच्या संचालकांची बंदद्वार बैठक झाली. त्यात जैन एरीगेशनलाच या योजनेचे पुढील काम करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, पुढील कामासाठी मुदत मिळण्यासाठी आता नगरपालिकेकडे ठेकेदार जैन इरीरगेशन प्रस्ताव देणार असून सर्वसाधारण सभेत सभागृहाकडू त्यास मुदतवाढ घेण्यात येणार आहे.
वर्षभरात योजनेचे काम मार्गी लागण्याची आशा
अमृत योजनेचे काम रखडल्याने जिल्हाधिकार्यांनी पालिकेच्या बैठकीत योजनेचे कंत्राट टर्मिनेट करण्याची सूचना केली मात्र तसे केले असतेतर योजा रखडण्याची भीती होती व पुन्हा योजनेची किंमत वाढून आर्थिक फटकाही बसण्याची शक्यता होती मात्र बुधवारच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर जैन इरीगेशनने वाढीव मुदतीत काम करून देण्याचे ठोस आश्वासन दिल्याने आता तिढा सुटला आहे. पुढील आठ ते नऊ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या पुढाकाराने योजनेला गती
शहरात अमृत योजनेचे 50 टक्के काम अपूर्ण असून पहिल्या टप्प्यातील कामाची मुदत 31 डिसेंबरला संपल्यानंतर कामही रखडले होते. या योजनेला गती येण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेत बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावी. जैन इरीगेशन कंपनीला शहरातील अमृत योजनेचे काम करण्यासाठी वाढीव मुदत देण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. बैठकीत आमदार संजय सावकारे, जैन इरीगेशनचे संचालक अभय जैन, नगराध्यक्ष रमण भोळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सी.पी. निकम, जैन इरीगेशनचे वरीष्ठ अभियंता, जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता आदी उपस्थित होते.
आधी व्हावे शिल्लक पाईप-लाईन काम
अमृत योजनेंतर्गत 213 किलोमीटरपैकी 103 किलोमीरची पाईपलाईन अंथरण्याचे काम अपूर्ण असून कनेक्शन जोडणी ही कामे आधी पूर्ण करण्याच्या सूचना आमदार संजय सावकारे यांनी मांडल्या. पुन्हा कनेक्शन देण्यासाठी रस्त्यांची फोडफाड होणार नाही व या कामानंतर शहरातील सर्वच रस्ते सुसज्ज पध्दतीने करता येतील, असे मत त्यांनी मांडले.
यांच्या उपस्थितीत झाली बैठक
बुधवारी शासकिय विश्रामगृहात बंदव्दार झालेल्या बैठकीस आमदार संजय सावकारेंसह नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, जैन इरीगेशनचे संचालक अभय जैन, वरीष्ठ इंजिनिअर, एमजीपीचे निकम, स्विकृत नगरसेवक मनोज बियाणी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, पुरुषोत्तम नारखेडे, बापू महाजन, सतीश सपकाळे आदी नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.