भुसावळात पत्रकार परीषदेत माजी आमदार संतोष चौधरींची माहिती : अतिक्रमणधारकांचे त्याच जागेवर पुर्नवसनाची मागणी
भुसावळ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवून वर्दळीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची दोषींकडून वसुली करावी शिवाय कोच फॅक्टरीच्या नावाने अतिक्रमण हटवून गोरगरीबांचे संसार उघड्यावर आल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा रेल्वेच्या त्याच जागेवर निवारा व दुकाने बांधू द्यावीत, रस्त्यांची दुरवस्थेमुळे नाहक प्राण गमावावे लागल्याने लोकप्रतिनिधींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी मंगळवार, 7 रोजी दुपारी दोन वाजता यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली. सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परीषद घेतली. हे आंदोलन राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व जनआधार विकास पार्टीच्या माध्यमातून होत असल्याचेही माजी आमदार म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी कृउबा समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, आऊं चौधरी, अनिता खरारे, बुटासिंग चितोडीया, युवराज पाटील, प्रकाश निकम, रवींद्र निकम, मुन्ना सोनवणे आदींची उपस्थिती होती.
सातबारा उतार्यावर बसवावेत बोजे
चौधरी म्हणाले की, अमृत योजनेचे काम करताना प्रचंड भ्रष्टाचार झाला असून टेंडर प्रक्रियाबाबत पालिका सभागृहाबाहेर डिलिंग करण्यात आले तर सुरूवातील उद्भव निश्चित करून जलकुंभ बांधणे गरजेचे असताना सुरूवातीला नुसते पाईप अंथरून बिले काढून रक्कम लाटण्यात आली. राष्ट्रवादीच्या काळात ही योजना मंजूर झाली मात्र पालिकेकडे योजनेसाठी भरावा लागणारा हिस्सा नसल्याने आम्ही त्यावेळी योजनेचे काम सुरू केले नाही मात्र सत्ताधार्यांनी दिशाभूल करून कामांना सुरूवात केल्याने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सूचक-अनुमोदक यांच्यावर कारवाई करावी शिवाय झालेल्या नुकसानीची वसुली यांच्या मालमत्तांवर बोजे लावून करावा, असेही ते म्हणाले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
भुसावळातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरीकांची हाडे खिळखिळी झाली असून तातडीने रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होवून अनेकांचे बळी गेल्याने या प्रकरणी दोषी लोकप्रतिनिधींविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. पालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे 12 कोटींचा निधी परत गेल्याने याबाबत चौकशीची मागणी जिल्हाधिकार्यांकडे करू, असेही त्यांनी सांगत अमरदीप चौकात पाईप टाकण्यासाठी पालिकेकडे पैसे नसल्याने आम्ही भीक मागो आंदोलन करून काम करू, असेही ते म्हणाले.
बोगस बिलांची चौकशी करावी
पालिकेच्या मुख्याधिकारी सुटीवर असताना एका मुख्याधिकार्यांनी कोट्यवधींच्या बिलांवर स्वाक्षर्या केल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे करू तसेच कोच फॅक्टरीच्या नावाखाली अतिक्रमण हटवून कुंपणे बांधण्यात आल्याने तत्कालीन डीआरएम आर.के.यादव व आर.एस.तोमर यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. नाल्यांकाठी काहींनी अतिक्रमणे करीत घरे व दुकाने बनवून विक्री केल्याने हे बांधकाम निश्चित तुटणार असल्याचेही ते म्हणाले.
भुसावळात वाढली गुन्हेगारी
शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून शहरात कोम्बिंग राबवल्यास किमान पोतेभर गावठी कट्टे आढळतील, असा दावाही माजी आमदारांनी केला. भुसावळात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून आता भुसावळात मुली द्यायच्याच नाहीत, असे मुलींच्या पालकांनी ठरवल्याचा दावाही चौधरींनी केला. शहरात कुठलेही उद्योगधंदे नाहीत शिवाय शहराची अवस्था बकाल झाल्याचेही ते म्हणाले.