भुसावळ। शहरासह परिसरात अनेक ठिकाणी मंगळवार 23 रोजी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची उन्हाच्या उकाड्यापासून सुटका झाली. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी पडलेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरुन येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. दुपारी 4.30 वाजता वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. शहर व परिसरात पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा जाणवला. जोरदार वार्यामुळे बाजारात विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानावरील छते उडाली, ग्राहकांची देखील यामुळे त्रेधातिरपीट झाली. घामेघुम झालेल्या शहरवासियांना बर्याच अवकाळी पावसाने थंडावा मिळाला.
अर्धातास पावसाची दमदार हजेरी
गेल्या आठवड्यापासुन सुरु असलेल्या ढगाळ वातावरणानंतर आज दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार स्वरुपाची हजेरी लावली. मंगळवारी दुपारी कडाक्याचे ऊन असताना दुपारी 4 वाजता ढग दाटुन आले अन् वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी बरसला. सुमारे अर्धा तास दमदार हजेरी लावल्यानंतर थोडा वेळ रिमझीम बरसात चालुच होती. गेल्या आठवड्यापासुन शहरात कडक ऊन्हासह ढगाळ वातावरणाची लपाछपी पहावयास मिळत होती.
शहरवासियांमध्ये समाधान
शहरात तीन वाजेपासून ढग दाटून आले, यानंतर सोसाट्याचा वारा सुटून पाऊस अखेर बरसला. जोरदार स्वरुपात पडलेल्या अवकाळी पावसाने थोडा थंडावा जाणवला. पारा 42 पार असल्याने भुसावळकर पाऊस पडण्याचीच वाट पाहत होते. गेल्या दोन दिवसापासुन सायंकाळी जोराचा वारा सुटल्याने दमदार पाऊस पडेल असे वाटत होते, पण पावसाने दडी मारली होती. तसेच वातावरणातील प्रचंड आर्द्रतेने भुसावळकर घामेघुम झाले होते. गेल्या चार दिवसापासुन हवामानात ऊन सावलीचा खेळ चालुच होता. या पावसाने शहरवासियांना भिजविल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शेतीच्या नुकसानीची शक्यता
फैजपूर शहर परिसरात देखील दुपारी 4.15 वाजेपासून वादळी वार्यासह जोरदार स्वरुपाचा पाऊस बरसला. यामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. शेतात गेलेल्या शेतकर्यांना देखील आपले काम अपुरे सोडून घराकडे परतावे लागले. या पावसामुळे शहरवासियांना उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेती पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. वार्यामुळे केळीचे खोड देखील कोलमडून पडल्याची घटना काही ठिकाणी घडली.