भुसावळात अवैधरीत्या वाहनात गॅस रीफिलिंग : एक अटकेत
तीन रीक्षांसह व चार सिलिंडर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केले जप्त : तीन रीक्षा चालकही चौकशीकामी ताब्यात
भुसावळ : शहरातील पटेल कॉलनी भागात अवैधरीत्या घरगुती सिलिंडर वाहनात भरले जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानक धाड टाकत तीन रीक्षांसह चार गॅस सिलिंडर गॅस रीफिलिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सलमान अब्दुल मजीद पटेल (30, रा.भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली तर तीन रीक्षा चालकांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने शहरात अवैधरीत्या गॅस रीफिलिंग करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
शहरातील पटेल कॉलनीतील रहिवासी अब्दुल मजीद पटेल हे अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडर वाहनांमध्ये रीफिलिंग करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी 12.40 वाजता पोलिसांनी धाड टाकत गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन रीक्षा, दोन खाली व दोन भरलेले सिलिंडर तसेच गॅस रीफिलिंगसाठी लागणारे साहित्य मिळून 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत पटेल यांना अटक करण्यात आली तर गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन रीक्षा चालकांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. मोहसीन रहिम बागवान (रा.गौसिया नगर, भुसावळ), संजय तुकाराम खोडपे (रा.आनंदनगर, भुसावळ), सुरज शंकर कदम (रा.रुपवते सोसायटी, भुसावळ) अशी ताब्यात घेतलेल्या रीक्षा चालकांची नावे आहेत. सहा.पुरवठा अधिकारी विजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीत अब्दुल पटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार रवींद्र बिर्हाडे, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, जीवन कापडे, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे आदींच्या पथकाने केली.