भुसावळात अवैध बॅनर्स व होर्डिंग्ज हटवले

शहर विद्रुपीकरणाला चाप : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर पालिका व प्रशासनाची मध्यरात्री संयुक्त कारवाई

भुसावळ : शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणारे अवैध बॅनर्स व होर्ग्डिंग्ज काढण्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ऑनलाईन बैठकीत निर्देश दिल्यानंतर भुसावळ शहर पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रात्री 12 ते पहाटे चार दरम्यान शहरातील सर्वच भागातील अवैधरीत्या लावण्यात आलेल्या बॅनर्स व होर्ग्डिंग्ज काढल्याने शहराने मोकळा श्‍वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून या बॅनर्सबाबत ओरड होत असतानाही पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने सुज्ञ नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, यापुढे अवैधरीत्या बॅनर्स व होर्ग्डिंग्ज लावल्याचे दिसताच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस व पालिका प्रशासनाने दिला आहे.

शहराने घेतला मोकळा श्‍वास
शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यातील सर्वच पालिका अधिकार्‍यांसह पोलीस प्रशासनाला स्थानिक स्तरावर लावण्यात आलेले अवैधरीत्या बॅनर्स व होर्ग्डिंग्ज हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत पालिका व पोलीस प्रशासनाने दोन टीम तयार करून कारवाईला वेग दिला. शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस हद्दीमध्ये एक अशा दोन टीमद्वारे अवैध बॅनर्स हटवण्यात आले.

या भागातून हटवले बॅनर्स
शहरातील जामनेर रोड, तापी नदी पात्र ते पाणी गेट त्याप्रमाणेच जुना जळगाव रोड, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परीसर, रजा टॉवर, खडका चौफुली जोडणारा रोड, खडका चौफुली ते नाहाटा चौफुली दरम्यानचा रोड या सर्व भागातील अवैध बॅनर्स या मोहिमेदरम्यान कडून घेण्यात आले. एकूण 227 बॅनर्स व होर्ग्डिंग्ज जप्त करण्यात आल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कुणीही आक्षेपार्ह बॅनर्स लावून तणाव निर्माण करू नये तसेच अवैधरित्या लावलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस होणारा अडथळा व अपघात टाळण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

अधिकृत 48 ठिकाणी बॅनर्स लावण्याची परवानगी
भुसावळ शहरांमध्ये नगरपालिकेकडून 48 ठिकाणी अधिकृत बॅनर्स लावण्याच्या जागा ठरवून देण्यात आल्या आहेत. जाहिरातदार, नागरीक वा लोकप्रतिनिधींना बॅनर्स लावावयाचे असल्यास त्याच ठिकाणी पूर्वपरवानगीने बॅनर लावता येणार आहे शिवाय परवानगीप्राप्त ठिकाणी कारवाई होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांच्या पथकाने केली कारवाई
भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी श्री संदीप चिद्रवार व त्यांच्याकडील 25 कर्मचार्‍यांचा स्टाफ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचार्‍यांसह पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.

भुसावळातील अतिक्रमणावरही पडणार हातोडा
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या शहरात निर्माण झाली आहे. या अनुषंगाने वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. पुढील आठवड्यापासून सुरूवातीला जामनेर रोडवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असून त्यानंतर टप्प्या-टप्प्याने अन्य भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. नागरीकांनी आठवडाभरात स्वतःहून अतिक्रमण काढावे अन्यथा कारवाई अटळ असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.

भुसावळातील अतिक्रमणही हटणार : मुख्याधिकारी
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर शहरातील 227 अनधिकृत बॅनर्स जप्त करण्यात आले. यापुढे विनापरवाना बॅनर्स व होर्ग्डिंग्ज लावण्यात आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल शिवाय पुढील आठवड्यापासून जामनेर रोडवरील अतिक्रमण व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने शहरातील अन्य भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येईल, असे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.