भुसावळ : शहरातील अवैधरीत्या होणार्या वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनातील अधिकारी कारवाईच्या रडारवर असतानाच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई केल्याने वाळू माफियांच्या गोटात खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सुभाष गॅरेजजवळ डंपर (एम.एच.19 सी.वाय.1679) मधून वाळूची वाहतूक होत असताना पोलिस प्रशासनाने चालकास परवाना विचारल्यानंतर तो न आढळल्याने डंपर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. या प्रकरणी पोलिस नाईक संकेत अरुण झांबरे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक दीपक भीमा ठाकरे (23, भवानी नगर, साकेगाव, ता.भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात वाळूची चोरटी विक्री केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय मोहम्मद वली सैय्यद करीत आहेत.