पालिका प्रशासनाची बेफिकीरी वृक्ष तोडणार्यांच्या पथ्थ्यावर
भुसावळ- शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्या शांतीनगर भागात मोठया प्रमाणात वृक्षतोडीचा प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. वृक्षतोडीसाठी रविवारचा मुहूर्त शोधला जात असल्याने पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही त्यामुळे ही बाब आयतीच वृक्ष तोड करणार्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे. या प्रकाराकडे पालिका मुख्याधिकार्यांनी जातीने लक्ष द्यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
डेरेदार वृक्षांची शहरात कत्तल
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात येत अरहे तर दुसरीकडे वृक्षरोपांची लागवडही केली जात आहे मात्र शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणार्या वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसापासून हिरव्यागार व डेरेदार वृक्षांवर कुर्हाडीचे घाव घालून वृक्षांना नामशेष करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. वृक्षतोडीमूळे पालिका प्रशासनाच्या कारवाईचा ससेमिरा नको म्हणून रविवारचा मुहूर्त शोधला जातो. रविवारी सुद्धा शांतीनगर भागातील महिला महाविद्यालयालगत वृक्षांवर कुर्हाड चालवण्यात आली. या प्रकारावर नगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने नागरीकांचे व वृक्षतोड्यांचे चांगलेच फावत आहे तर अशा वृक्षतोडीमूळे पर्यावरण व निसर्गप्रेमी नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्याधिकार्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता
वृक्षतोडीच्या प्रकाराकडे प्रभागातील नगरसेवकांचेही जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. रविवारचा मुहूर्त साधून वृक्षतोडीला एक प्रकारे नगरसेवकांचेच पाठबळ मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनीच कारवाईसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एकीकडे वृक्षतोड तर दुसरीकडे वृक्षारोपण
शांतीनगर भागात एका हिरव्यागार व डेरेदार वृक्षावर कुर्हाडीचे घाव घालून नष्ट केले जात होते तर याच भागातील दुसर्या गल्लीत एक कुटुंब मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करीत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे वृक्षतोड करणार्या नागरीकांनी अशा कुटुंबियांपासून चांगला बोध घेण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासनाने रविवार अथवा सुटीच्या दिवशी कर्मचार्यांचे गस्ती पथक सक्रीय करून वृक्षतोडीवर बंधन आणणे आवश्यक झाले आहे.
पालिका प्रशासनाचेही वृक्षलागवडीकडे होतेय दुर्लक्ष
शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक आहे मात्र पालिका प्रशासनाकडून केवळ वृक्षलागवडीचा गाजावाजा केला जात असून वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे पालिका प्रशासनाने व्यापक स्वरूपात वृक्षारोपण करून वृक्षतोड करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची शहरातील वृक्षप्रेमी करीत आहेत.