भुसावळ : रेल्वेत खलासी असलेल्या मुलासह आईचा मृतदेह घरात आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. उच्च तापमान वा हृदयविकारामुळे हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बबनबाई डॅनियल पटेकर (70) व त्यांचा मुलगा फ्रॉन्सिस डॅनियल पटेकर (52) अशी मयतांची नावे आहेत.
कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील आरपीएफ बॅरेकमागील गंगोत्री नगरातील रेल्वेच्या क्वॉर्टर 662/एचमध्ये माय-लेकांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. खलासी असलेले फ्रॉन्सीस पटेकर हे कामावर काम येत नाही म्हणून चौकशी करण्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या कर्मचार्यांना हा प्रकार दिसल्यावर घटना उघड झाली. या कुटुंबातील पटेकर यांची बहिण गतीमंद आहे. आरपीएफ निरीक्षकांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मृतदेह घरात पडून असल्याने ते मृतदेह कुजलेल्या स्थितीत होते. गंगोत्री कॉलनीतील दोन्ही जणांच्या मृत्यूप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नामदेव गायकवाड (रा.गजानन महाराज नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वरणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी दोन्ही मृतदेहांचे जागेवरच विच्छेदन केले.