भुसावळ : शहरात होळी व धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गस्त वाढवली आहे शिवाय शुक्रवार, 18 रोजी दिवसभर शहरातील समता नगर, गांधी पुतळा, बाजारपेठ पोलिस ठाणे, अष्टभूजा चौफुली, रजा टॉवर भागात पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
मद्यपी चालक पोलिसांच्या रडारवर
विनाकारण रस्त्यांवर फिरणार्यांसह सायलेन्सर काढून वाहन चालवणारे तसेच रॅश ड्रायव्हींग करणार्यांसह विनाकारण सार्वजनिक ठिकाणी हॉर्न वाजवणारे तसेच मद्य (दारू) पिवून वाहन चालवणार्यांवर शुक्रवारी दिवसभर विशेष मोहिमेच्या माध्यमातून पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. शहर व तालुक्यातील विविध हॉटेल्स, ढाब्यांवर अनधिकृतरीत्या होणारी मद्य विक्री लक्षात घेता पोलिसांच्या विविध पथकांकडून अचानक छापे टाकून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. वाहनधारकांनी नियमांचे पालन करून कागदपत्रे सोबत बाळगावीत, नियम धाब्यावर बसवणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून नागरीकांनी धुलिवंदनाचा सण उत्साहात मात्र शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी केले आहे.