भुसावळात आडत दुकानातील लाखांच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला

0

भुसावळ- शहरातील आठवडे बाजारातील आडत दुकानदाराच्या दुकानातील सुमारे एक लाखांच्या रोकडवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास शून्य असतानाच सातत्याने चोर्‍या वाढत असल्याने नागरीकांसह व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील आठवडे बाजारात विजयकुमार चंद्रलाल लोकवाणी (49, गणेश कॉलनी, खडका) यांचे आडत दुकान आहे. दिवसभरातील व्यवहारापोटी त्यांनी रविवारी सायंकाळी व्यवहार आटोपून दुकान बंद केले व दुकानातील कपाटात 99 हजार 700 रुपयांची रोकड ठेवून घर गाठले. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यास गेले असता त्यांना कपाटातील रक्कम चोरीस गेल्याचे आढळले. अज्ञात चोरट्याने दुकानात कुठूनतरी प्रवेश करून ही चोरी झाल्यास पोलिसांचा कयास आहे. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बळवंत कंक करीत आहेत.