भुसावळात आढावा बैठकीत अधिकारी धारेवर

0

वृक्षारोपण न केल्यास कारवाईचा इशारा ; कर वसुली न करणारे ग्रामसेवक धारेवर

भुसावळ- जिल्हा परीषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारी भुसावळ पंचायत समितीच्या सभागगृहात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कामकाजाची आढावा बैठक घेत अधिकारी, कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. सोमवारी जिल्हा परीषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी.बोटे यांनी भुसावळ पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.

चार तास चालली आढावा बैठक
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.बी.मावळे, सहायक गटविकास अधिकारी एस.डी.पाटील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यु.पी.पाटणकर यांची उपस्थिती होती. सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू झालेली आढावा बैठक चार वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी ए.बी.बोटे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय वसुली व इतर कामकाजाचा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पावसाळा सुरू होण्यापुर्वी ग्रामपंचायत स्तरावर वृक्ष लागवडसाठी तातडीने खड्डे खोदण्याच्या सूचना केल्या तसेच आवश्यक असल्यास जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदण्याच्याही सूचना केल्या.कसूर करणार्‍या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

वृक्ष लागवड करा अन्यथा कारवाईला सामोरे जा
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार्‍या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदलेले आढळून न आल्यास वृक्ष रोपे मिळणार नाही शिवाय वृक्ष लागवडीकडे कानाडोळा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी सर्वांनी पावसाळ्यापुर्वी खड्डे खोदण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

वसुली न करणार्‍यांची कानउघाडणी
गावाच्या विकासासाठी कर वसुली आवश्यक असून सर्वांनी कर वसूलीवर भर द्यावा, असे सांगत यावेळी वसूलीचे प्रमाण कमी असणार्‍या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. बैठकीला तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीचे 39 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हजर होते.

सर्व विषयांचा घेतला आढावा
शासनाने ठरवुन दिलेल्या आराखड्यानूसारच ग्रामपंचायत स्तरावर कामे करणे आवश्यक असून आराखडा बदलवणे असल्यास वरीष्ठ स्तरावरून परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. यावेळी गावातील पाणीपुरवठा, आरोग्य विभाग अशा विविध विषयांचा आढावा घेवून अडी-अडचणीवर चर्चा करण्यात आली.