भुसावळात आमदार संजय सावकारेंनी साधली हॅट्रीक

0

ऐतिहासीक विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पावसातही जल्लोष

भुसावळ- भुसावळात विधानसभा निवडणुकीसाठी आखाडा गाजल्यानंतर व अत्यल्प मतदान झाल्याने कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता लागली असतानाच भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी विजयश्री खेचून आणून हॅट्रीक साधली. प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे व अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांचा त्यांनी दारुण पराभव केला. 53 हजार 14 मतांचा लीड मिळवून ते विजयी झाले. ऐतिहासीक विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आमदार संजय सावकारे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

पहिल्या फेरीपासून मतांची घेतली आघाडी
नवीन प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजेपासून मतमोजणीला प्रत्यक्षात प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून आमदार संजय सावकारे यांनी मताधिक्यात आघाडी घेतली होती मात्र आठव्या व नवव्या फेरीत मात मताधिक्यात काहीशी घट झाली मात्र 17 व्या फेरीत आमदारांनी त्यांचाच गेल्यावेळचा (34637) मतांचा रेकॉर्ड तोडत 35 हजार 280 मतांची आघाडी घेतली.

पदाधिकार्‍यांनी केला जल्लोष
आमदार संजय सावकारे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतल्याने पदाधिकार्‍यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते तर 51 हजारांचा लीड क्रॉस केल्यानंतर पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात जल्लोष केला. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, मनोज बियाणी, दीपक धांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, दिनेश भंगाळे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजीव सूर्यवंशी, गिरीश महाजन, रवी निमाणी, शिवसेना शहराध्यक्ष बबलू बर्‍हाटे, नरेंद्र पाटील, पवन बुंदेले, शेतकी संघ संचालक प्रशांत निकम, रवी पाटील, प्रथमेश गुलईकर, अर्जुन खरारे, रमाशंकर दुबे, दिनेश नेमाडे, नितीन नंदवणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक विभागाची अनागोंदी : माध्यमांना माहिती दिलीच नाही
निवडणुकीची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र मिडीया कक्ष उभारला असलातरी प्रसिद्धी माध्यमांना कुठलीही माहिती संबंधित विभागाकडून न मिळाल्याने पत्रकारांनी या कक्षावरच बहिष्कार टाकला. या कक्षात टीव्ही लावून राज्याच्या घडामोडी दाखववण्यात आल्याने निवडणूक विभागाचा हास्यास्पद कारभारही उघड झाला. उलट मतमोजणी कक्षावरील अपडेट मिडीया कक्षात मिळणे गरजेचे असताना लाऊड स्पीकरवरून बाहेरील कार्यकर्त्यांना आतील माहिती मिळत होती मात्र स्थानिक पत्रकारांना माहिती न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. या कक्षात स्पीकर लावण्याची व्यवस्थाही करण्यात न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दर दोन तासांनी दोन पत्रकारांना आतमध्ये सोडण्यात येईल, असे सांगून एक प्रकारे प्रसिद्धी माध्यमांची गळचेपी करण्यात आल्याचा सूरही यानिमित्त उमटला. आमदार संजय सावकारे यांनीही पत्रकारांबाबत समस्या मांडूनही अधिकार्‍यांनी दखल न घेतल्याने संताप व आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. पत्रकारांनी मिडीया कक्षावर बहिष्कार टाकत जमिनीवरच ठिय्या मांडून आतमधील पदाधिकार्‍यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत माहिती मिळवली.

आमदारांसह महाआघाडीच्या उमेदवारांचे सोबत जेवण
भुसावळच्या आखाड्यात खर्‍या अर्थाने आजी-माजी आमदारांवर आरोप करून निवडणूक गाजवणारे महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे हे चर्चेत राहिले. राष्ट्रवादीच्या स्थानिक कुठल्याही पदाधिकार्‍याची साथ न मिळाल्याने त्यांनी एकट्यानेच किल्ला लढवला मात्र त्यांचा दारुण पराभव झाला व त्यांनी सुमारे 20 हजारांपर्यंत मते घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधातील भाजपाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांची त्यांनी घेतलेली गळा भेट निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत राहिली तसाच किस्सा गुरुवारीदेखील घडला. मतमोजणी कक्षात आमदार सावकारे, अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांचे पती डॉ.राजेश मानवतकर व महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे हे उपस्थित असताना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास आमदार सावकारे व जगन सोनवणे यांनी सोबतच पुरी-भाजीचे जेवण घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांमध्ये बर्‍यापैकी संवाद झाला मात्र डॉक्टरांनी मात्र बोलणे टाळले.

मोबाईलबाबत डॉक्टरांनी नोंदवला आक्षेप
मतमोजणी कक्षात मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याबाबत डॉ.राजेश मानवतकर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी मात्र कडेकोट बंदोबस्त करत मेटल डिटेक्टरने तपासणी करून कुणालाही आत सोडले नाही. काही पदाधिकार्‍यांचे मोबाईल आतमध्ये निवडणूक अधिकार्‍यांनी जप्त केल्याचेही सांगण्यात आले.

विजय निश्‍चितीनंतर आमदार बसले मिडीया कक्षात
निवडणुकीत विजय डोळ्यापुढे दिसत असाताना आमदार संजय सावकारे यांनी रीलॅक्स होत मिडीया कक्षात टीव्ही पाहून राज्यातील घडामोडींचा आढावा घेतला. बराच वेळ ते कक्षात बसून होते. 53 हजारांचा लीड गेल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्रांताधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त
प्रांताधिकारी कार्यालयात मतमोजणीप्रसंगी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखला. स्वतः पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार तसेच वरणगावचे सहाय्यक निरीक्षक संदीपककुमार बोरसे यांच्यासह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त राखवला. मतमोजणी कक्षात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरने प्रत्येकाची तपासणी करण्यात आली शिवाय मोबाईल आतमध्ये नेण्यास प्रतिबंध करण्यात आला.

रुग्णवाहिका, अग्निशमन दल सज्ज
प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रशासनातर्फे चोख व्यवस्था ठेवण्यात आली. तातडीच्या उपाययोजना म्हणून रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाचे वाहन तैनात ठेवण्यात आले होते तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीच्या उपाययोजना म्हणून जनरेटरही सज्ज ठेवण्यात आले.

प्रसाधनगृहाअभावी महिलांची कुचंबणा
नवीन प्रांताधिकारी कार्यालयात पुरूष व महिला पोलिस व होमगार्ड कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता शिवाय बाहेर गावावरून अनेक कर्मचारी आले होते. महिला कर्मचार्‍यांसाठी तात्पुरत्या प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे गरजेचे असताना त्याबाबतही दखल घेण्यात न आल्याने अनेक महिला कर्मचार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तीन हजार 277 मतदारांनी स्वीकारला नोटाचा पर्याय
विधानसभा निवडणुकीत तीन हजार 277 मतदारांनी रींगणातील 12 उमेदवारांना नाकारत नोटाचा पर्याय निवडला त्यामुळे देखील मताधिक्यावर परीणाम झाल्याचे दिसून आले. सुशिक्षीत म्हणून गणल्या जाणार्‍या पोस्टल मतदानात तब्बल सात मते बाद झाली. सुमारे तीन लाख सात हजार मतदारांपैकी या निवडणुकीत एक लाख 50 हजार 661 मतदारांनी आपला हक्क (48 टक्के) बजावला होता. दरम्यान, पोस्टल मतदानात सर्वाधिक मतदान आमदार संजय सावकारे यांना 646 इतके झाले तर डॉ.मधू मानवतकर यांना 275 मते मिळाली तर अन्य उमेदवारांना अवघी एक वा दोन आकड्यांवर समाधान मानावे लागले.

जेवणासह पाणी न मिळाल्याने निवडणूक कर्मचार्‍यांचा संताप
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांना गुरुवारी सकाळचा नास्ता व दुपारनंतर थेट सायंकाळपर्यंत जेवण न मिळाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतमोजणी केंद्रात पाणीदेखील मिळाले नसल्याची तक्रार या कर्मचार्‍यांनी केली मात्र दखल घेतली न गेल्याने त्यांनी बाहेर असलेल्या प्रसिद्धी माध्यमांकडे व्यथा मांडली.