भुसावळात आरक्षण जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम

आरक्षणानंतरही विद्यमान नगरसेवक ‘सेफ’ : प्रभाग 3, 4, 5, 13 व 8 मध्ये एससी-एसटी गटातून महिलांना संधी

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत असल्याने नेमके काय आरक्षण निघते? याकडे शहरातील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले असताना सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे काही भागात विद्यमान लोकप्रतिनिधींना आता सौभाग्यवतींना पुढे करावे लागणार आहे तर सर्वसाधारण जागेमुळे इच्छूकांची भाऊगर्दी वाढणार असल्याने प्रस्थापीतांना चांगलाच संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे. शहरातील प्रभाग 3, 4, 5, 13 व 8 मध्ये एससी-एसटी गटातून महिलांना संधी मिळणार आहे. पालिका निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी दोन वाजता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

शहरात महिलाराज येणार : विद्यमान नगरसेवकास धक्का
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 10, 3, 4, 2, 5, 13, 19 व 1 या आठ प्रभागांत आरक्षण असून यातील 3, 4, 5 व 13 या प्रभागातील अ वॉर्डाला महिला राखीव आरक्षण निघाले तर अनूसूचित जातीच्या प्रभाग आठ व 21 मध्ये 8 अ या जागेसाठी महिला आरक्षण ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आले. उर्वरित सर्व प्रभागांच्या अ जागेवर महिला राखीव उमेदवार आहेत. आरक्षण सोडतीत प्रभाग 10 मधून विद्यमान नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांची पुन्हा नगरसेवक होण्याची संधी हुकली आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त अन्य जागांवर आरक्षण सोडतीनंतर विद्यमान व मातब्बरांना कोणताही फटका बसला नसल्याने हे लोकप्रतिनिधी सेफ झोनमध्ये असल्याचा जाणकारांचा कयास आहे.

असे आहे पालिकेचे आरक्षण
प्रभाग एक अ- अनूसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग दोन अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग चार अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सात अ– सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग आठ अ- अनूसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग नऊ अ- सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण, प्रभाग दहा अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग अकरा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग बारा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग तेरा अ- अनूसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण प्रभाग चौदा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पंधरा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सोळा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सतरा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग अठरा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग एकोणावीस अ- अनूसुचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग वीस अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग एकवीस अ- अनुसूचित जमाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग बावीस अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग तेवीस अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग चोवीस अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पंचवीस अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण.