उन्हाळ्यात थंड पाण्यामुळे वाटसरूंची भागणार तृष्णा
भुसावळ- शहरातील उष्णतेची लाट व उष्माघाताची शक्यता पाहता वाटसरू व विद्यार्थ्यांची तहान भागवण्याच्या दृष्टीने शहरातील शारदा नगर परीसरात इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटीतर्फे जलशीतक (वॉटर कुलर) लावण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबने या उन्हाळ्यात शारदा नगरातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलसमोर जलशीतक उभारून पांथस्थ व विद्यार्थ्यांना थंड पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. क्लबच्या सदस्या स्मिता जीवन चौधरी यांनी सेवेचा भाव जपत या उपक्रमासाठी प्रायोजकत्व स्वीकारले. पाणपोईचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते झाले. उपक्रमास क्लबच्या अध्यक्षा सुनीता पाचपांडे, सेक्रेटरी डॉ.मृणाल पाटील, सदस्या स्मिता चौधरी, मोना भंगाळे, रजनी सावकारे, पल्लवी वारके, रेवती मांडे, सीमा सोनार, हेमलता सोनार यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.