भुसावळात ईव्हीएम बदलाच्या संशयावरून गोंधळ

0

पोलिस व प्रशासनाच्या मध्यस्थीने वादावर पडदा ; झोनल अधिकार्‍याला नोटीस

भुसावळ- शहरातील रेल्वे इंग्लिश स्कूल, मतदान केंद्र क्रमांक 42 वर एका पक्षाला लाभ होण्यासाठी थेट ईव्हीएम मशीनच बदलली जात असल्याच्या आरोपावरून काही कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी दुपारी 2.10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकाराची दखल घेत पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहरचे उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी धाव घेत जमाव पांगवला. झोनल अधिकार्‍यांसह वाहनावरील चालकासह दोन कर्मचार्‍यांना जेवणासाठी जायचे असल्याने रीझर्व्ह मशीन दुसर्‍या वाहनात ठेवताना पाहिल्याने कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली तर या प्रकाराबद्दल झोनल अधिकार्‍यांना प्रांताधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे.

ईव्हीएम दुसर्‍या वाहनात ठेवताना बळावला संशय !
मतदान केंद्र क्रमांक 42 वरील झोनल अधिकारी आर.एम.महाजन यांच्या वाहन (क्रमांक एम.एच.19 बी.व्ही.6246) मध्ये तीन रीझर्व्ह मशीन ठेवण्यात आले होते. या वाहनावरील चालकासह झोनल अधिकार्‍यांना जेवण्यासाठी जायचे असल्याने त्यांनी हे मशीन दुसर्‍या वाहनात (एम.एच.19 सीव्ही 2127) मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला असतानाच एका कार्यकर्त्याने ही बाब पाहिल्यानंतर त्याने आपल्या काही साथीदारांना माहिती दिली. एका पक्षाला लाभ होण्यासाठी ईव्हीएम बदलण्यात आल्याचा संशय बळावल्याने कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड संताप करीत गोंधळ घातला. पोलिस प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी झोनल अधिकार्‍यांसह ते ईव्हीएम व वाहने मुख्य प्रशासकीय इमारतीत नेली. यावेळी सहा.निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी झोनल अधिकारी आर.एम.महाजन यांना झाल्या प्रकाराबद्दल नोटीस बजावत तातडीने केंद्रावर रवाना केले.