भुसावळ : गेल्या दहा दिवसांपासून बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू जनतेवर अमानुषपणे वारंवार हल्ले होत असून हिंदू मंदिराची तोडफोड केली जात आहे, दुर्गा मंडप व इस्कॉन मंदिर यांना आगी लावण्यात आल्या, मूर्तीची विटंबना करण्यात आली, श्रीमद्भागवतम् व भगवद्गीता यांसारख्या पवित्र ग्रंथांना आग लावण्यात आली, हिंदू वस्त्यांवर आक्रमण केले जात आहेत, स्त्रीयांवर बलात्कार केले जात आहेत, इस्कॉन मंदिरातील भक्त प्रांतचंद्र दास, जतनचंद्र दास, पार्थ दास यांची निर्घृण हत्या केली गेली या अमानवी घटना सरकारने थांबवून समाजात शांतता पाळण्यात यावी व हिंसक कार्यांचा निषेध म्हणून शहरातील अष्टभुजा देवी मंदिराजवळून इस्कॉनच्या वतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
यांचा मोर्चात सहभाग
याप्रसंगी इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष रासयात्रा दास व मंदिरातील ब्रह्मचारी तसेच इस्कॉन भक्त समाज उपस्थित होता. यासोबतच आर.एस.एस.संघाचे कार्यकर्ते प्रवीण नायते, हर्षल सपकाळे व इतर स्वयंसेवक, हिंदू जनजागृती समितीचे सदस्य, अखिल भारतीय विद्या परीषदेचे सदस्य, वारकरी संप्रदायाचे सदस्य तसेच अन्य हिंदू सदस्य उपस्थित होते. दरम्यान, अष्टभुजा देवी मंदिर, जामनेर रोड या ठिकाणाहून निघालेला मोर्चा बाजारपेठ पोलीस स्टेशन, गांधी पुतळा यामार्गे डी.एस.ग्राउंडवर पोहोचला. या ठिकाणी हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.