भुसावळात उद्या रात्रीपासून तीन दिवस स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन

0

भुसावळ (गणेश वाघ) : शहरात कोरोनाचा वाढत असलेला फैलाव व बाधीत रुग्णांची तब्बल सहावर संख्या पोहोचल्याने शहरातील लोकप्रतिनिधी व व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने गुरुवारी रात्रीपासून तीन दिवस भुसावळ कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार ते रविवारदरम्यान हा स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येणार असून केवळ वैद्यकीय अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला व किराणा माल विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

लोकप्रतिनिधी व व्यापार्‍यांच्या उपस्थितीत निर्णय
नगरपालिका दवाखान्यात खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत कर्मचार्‍यांना पीपीई कीट तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी व उपस्थित व्यापारी व पदाधिकार्‍यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेपासून स्वयंस्फूर्तीने तीन दिवस शहर कडकडीत बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले. नागरीकांनी अत्यावश्यक वस्तूंची गुरुवारी दिवसभरात खरेदी करावी व रात्रीपासून स्वतःच तीन दिवस नियमांचे पालन करावे, असे ठरवण्यात आले शिवाय तीन दिवसांचा बंद संपल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचेही ठरले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, नगरसेवक अमोल इंगळे, व्यापार्‍यांचे प्रतिनिधी व नगरसेवक पिंटू कोठारी, गिरीश महाजन, अनिकेत पाटील, पृथ्वीराज पाटील, निलेश महाजन, जगदेव खराडे, अमोल महाजन, पवन बुंदेले उपस्थित होते.

तीन दिवस स्वयंस्फूर्तीने पाळावा बंद : आमदार संजय सावकारे
शहरात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या सहावर पोहोचली असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी गुरुवारी दिवसभरात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी व रात्रीपासून पुढील तीन दिवस स्वयंस्फूर्तीने शहर कडकडीत बंद ठेवावे व हा बंद संपल्यानंतर प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले आहे.

केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
शुक्रवार ते रविवार दरम्यान शहरवासीयांतर्फे कडकडीतरीत्या बंद पाळण्यात येणार आहे. या कालावधीत शहरात केवळ अत्यावश्यक म्हणून केवळ मेडिकल व वैद्यकीय सेवा सुरू राहतील मात्र किराणा विक्री तसेच भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी गुरुवारी दिवसभरात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी व तीन दिवस कडकडीत बंद पाळून कोरोना संक्रमणाची साखळी तोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.