भुसावळ- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाभरातील मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणारे ईव्हीएम भुसावळातील शासकीय गोदामात ठेवले आहेत. या यंत्रांच्या तपासणीची मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. 3 ऑक्टोबरपासून महिनाभर ही मोहिम राबवली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व त्यांचे 12 सहकारी असे पथक यंत्रांची तपासणी करणार आहे. बंगळुरूहून आलेली 11 हजार मतदान यंत्रांची महिनाभरात तपासणी पूर्ण केली जाणार आहे. यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांचेही पाच कर्मचार्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच बंगळुरू येथून ईव्हीएम तज्ज्ञ असणारे सात अभियंतेदेखील येणार आहेत. सर्वच इव्हीएम नवीन असल्याने त्यांची माहिती अभियंते कर्मचार्यांना देणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथील तहसीलदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून तपासणीसाठी 20 मजूर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान, इव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या परिसरात 24 तास सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्या ठिकाणी बंदोबस्तावरील पोलिसांसाठी राहुटी उभारण्यात आली आहे.