भुसावळ- जामनेर रोडवरील श्री साईबाबा मंदिर व साईबाबा ग्रुप भुसावळतर्फे साईबाबा महाप्रसाद, भंडार्याचे रविवार, 10 रोजी आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत 60 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. महाभंडार्यासाठी शुक्रवारपासूनच साईबाबा मंदिरासमोरील प्रांगणात तयारी सुरू असून मंदिराच्या प्रांगणात तब्बल 110 मंडप टाकण्यात आले आहेत. वरण-बट्टी, वांग्याची भाजी व शिरा असा महाप्रसादाचा मेनू आहे. तर सायंकाळी सात वाजेनंतर खिचडी व शिरा असा प्रसाद वितरीत केला जाणार असून बट्टीसाठी तब्बल 55 क्विंटल गव्हाचा वापर होईल, तर वरणासाठी 400 किलो डाळ वापरली जाणार आहे. 100 पोते अर्थात तीन हजार किलोची वांग्याची भाजी केली जाईल तर महाप्रसादात 15 क्विंटलचा शिरा तयार केला जाणार आहे. महाभंडार्यासाठी शहरासह तालुक्यातून साईभक्त हजेरी लावणार आहेत तर महाप्रसाद वितरण व व्यवस्थेसाठी तब्बल 500 साईभक्त तयारीला लागले आहेत. शहरातील सर्वांत मोठ्या या महाभंडार्यासाठी आयोजकांनी व्यापक नियोजन केले आहे. मंडपात दिवाबत्ती, महाप्रसादानंतर पाण्याची व्यवस्था, जामनेररोडवर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून स्वतंत्र व्यवस्था करणारे पथक असेल. महाप्रसादाचा साईभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक साईबाबा मंदिर व साईबाबा ग्रुपने केले आहे.