भुसावळात एअरगन काढून चित्रीकरण करणे कलावंतांना पडले महागात

0

भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील रजा टॉवर चौकात एअरगन काढून स्थानिक कलावंत चित्रीकरण करत असताना अफवांचे पेव फुटल्याने कुणीतरी बाजारपेठ पोलिसांना दूरध्वनी केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव सात कलावंतांना ताब्यात घेतले. कलावंतांच्या ताब्यातून छर्‍याची बंदूक जप्त करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांकडून या प्रकाराची अधिक चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाईची दिशा ठरवण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक देविदास पवार म्हणाले.

‘फनी’ फिल्म पडली कलावंतांना महाग
भुसावळातील स्थानिक सात कलावंतांद्वारे यु ट्यूब चॅनलसाठी ‘रईस’ चित्रपटाची फनी शॉर्टफिल्म बनवण्यासाठी रजा टॉवर चौकात शनिवारी दुपारी चित्रीकरण करत होते. गोल्डन ड्रीम प्रॉडक्शनचे डायरेक्टर ईम्रान खान यांच्या उपस्थितीत चित्रीकरणादरम्यान कलावंतांनी एअरगन रोखल्याने पाहता-पाहता जमावाची गर्दी वाढत गेली तर या प्रकारातून अफवांचे पेवही फुटल्याने कुणीतरी बाजारपेठ पोलिसांना जाम मोहल्ला भागात दिवसाढवळ्या बंदुक बाहेर काढल्याचा दूरध्वनीही केला. या प्रकाराची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे विनोद वीतकर, बापूराव बडगुजर, छोटू वैद्य, सुनील थोरात, संजय भदाणे यांच्यासह चालक तस्लीम पठाण यांनी जमावाला पांगवत सात कलावंतांना पोलिस वाहनातून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. सुरुवातीला पोलिस आल्यानंतर जमावाची पळापळ झाली तर कलावंतही एका गल्लीत घुसले मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

सात कलावंतांची पोलिसांकडून चौकशी
रईस या फनी चित्रपटाचे डायरेक्टर इम्रान खान यांच्यासह कॅमेरामन रमेश पाटील, कलावंत अझरूद्दीन शेख, शेख मोबीन, मझहर कुरेशी, शेख वसीम, शेख मुदफी आदींना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या कलावंतांची बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्याकडून कसून चौकशी सुरू होती.