नगरसेवक रवींद्र खरातांसह दोन्ही मुले व मोठे बंधू ठार : खरात भावंडांचा मित्रही ठार
भुसावळ : भुसावळातील नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व खरात भावंडांच्या एका मित्रावर अज्ञात आरोपींनी कुठल्यातरी कारणावरून चाकू तसेच गोळीबार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या मोठ्या भावंडांवर समता नगरात हल्ला झाला तर दोन्ही मुलांसह मित्रांवर आरपीडी रस्त्यावर घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी चाकूने हल्ला चढवला. दरम्यान, अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिस अधीक्षकांची धाव
भुसावळात एकाचवेळी खून झाल्याचे वृत्त पोलिस दलाला कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यातील डीबी तसेच आरसीपी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.
समता नगर परीसरात बंदोबस्त वाढवला
या घटनेच्या अनुषंगाने समता नगर परीसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री घटनास्थळाची जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर अधीक्षकांनी पाहणी केली. फॉरेेन्सिक तज्ज्ञांनी ठसे तसेच छायाचित्रे घेतली. आरोपींनी खूनासाठी वापरलेला चाकू तसेच अन्य शस्त्रही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते.
तासाभरात आरोपी जाळ्यात
खुनानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी तीनही आरोपींच्या तासाभरात मुसक्या आवळत त्यांना जळगावात हलवले. आरोपींनी नेमका खून का व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती मात्र उपलब्ध होवू शकली नाही. आरोपी अटकेच्या वृत्ताला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला.