भुसावळात एकाच दिवशी सहा दुकाने फोडली

0

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच तर बाजारपेठ हद्दीतील एका दुकानात चोरी ; 40 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

भुसावळ- शहर व बाजारपेठ पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांना टार्गेट करीत चोर्‍यांचा धडाका लावल्याने शहरातील व्यापारीवर्गात भीती पसरली आहे तर पोलिसांचा धाक चोरट्यांना उरला नसल्याने पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप जनतेतून व्यक्त होत आहे. पोलिसांची गस्त नावालाच उरत असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या पोलिस प्रशासनाने गस्तीच्या पद्धत्तीत बदल करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. बुधवारी पहाटे शहर हद्दीतील पाच तर बाजारपेठ हद्दीतील एका दुकानात चोरी करून चोरट्यांनी तब्बल 40 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला.

चोरट्यांचा सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न
गुरूद्वाराजवळील प्रभाकर सीताराम खंडेराव यांच्या प्रभू आर्ट टपरीचा लोखंडी अँगल तोडत या अँगलने बाजूलाच असलेल्या बाबू उन्नोनी यांच्या बाबु टायर वर्क्स या टायरच्या दुकानाचे दोन्ही कुलूप तोडत टायर दुकानात केवळ लोखंडी टॉमी लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीनाक्षी पान मंदीराचे कुलूप तोडून दुकानातील सिगारेटसह शीतपेयाचा आनंद लुटत नऊ हजारांची सिगरेटसह चार हजारांच्या चिल्लरवर चोरट्यांनी डल्ला मारला. धीरज चौरसिया याच्या मालकिची ही पानटपरी असल्याचे सांगण्यात आले तर चोरट्यांनी यानंतर भुसावळ पालिकेच्या दवाखान्याच्या बाहेरील संकुलात असलेल्या राधास्वामी मोबाईल दुकानाचे कुलूपही तोडण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. त्यानंतर समोरच असलेल्या अजंता मोबाईलचे पहाटे 4.12 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडले. आपली छबी सीसीटीव्ही न येण्यासाठी चोरट्यांनी कॅमेर्‍याची दिशाही बदलवली. मेमरी कार्ड, हेडफोन, मोबाईल चार्जर, पेनड्राईव, पॉवर बँकसह ग्राहकांचे दुरूस्तीसाठी आलेले दोन मोबाईल चोरट्यांनी लांबवत सामानाची फेकाफेक केली. पहाटे 4.16 वाजता चोरट्यांनी सीसीटीव्हीची वायर तोडल्याने रेकॉर्डींग थांबले तर एका चोरट्याचा चेहर्‍याला रूमाल बांधलेला फोटो कॅमेर्‍यात कैद झाल्याने दुकानदार प्रसन्न पांडे म्हणाले. पाच दुकानांना टार्गेट केल्यानंतर चोरट्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतीलडीस्को टॉवर परिसरातील श्री लक्ष्मी नारायण प्रोव्हीजन या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे सहा हजार रुपये कींमतीचे चार तेलाचे डब्बे तसेच पाच हजार रूपये रोख असा सुमारे 11 हजार रुपयांचा ऐवज ालंबवल्याने दुकान मालक राजेश दुबे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.