नाहाटा चौफुली परीसरातील घटना सोमवारी सकाळी आली उघडीस
भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीलगतच्या चार दुकानांना रविवारी रात्री चोरट्यांनी टागर्र्ेट करून एकाच पद्धतीने चार दुकाने फोडून किमान 25 हजाराचा मुद्देमाल लंपास केला . ही घटना सोमवारी उघडकीस आली.या प्रकरणाची बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रमोद डिगंबर सावकारे यांनी तक्रार केली आहे. शहरात गत काही दिवसापासुन लहान व मोठ्या चोर्यांचे सत्र सुरू असल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालयासमोरील पत्री शेडच्या चार दुकानांचे मागील बाजूने पत्रा कटरने कापुन चोरट्यांनी आपली हात की सफाई दाखवली.हि घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.यामध्ये प्रगती स्टेशनरी अॅन्ड जनरल स्टोअर्स,विजय झेरॉक्स,साई मेन्स पार्लर , रेडीयम सेंटर अशा चार दुकानांचा समावेश आहे.चोरीच्या घटनेत चारही दुकानातून चोरट्यांनी किमान 25 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.चोरीच्या घटनांनी शहरातील दुकानदार व नागरीकांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.यामूळे पोलीसांनी रात्रीच्या गस्तीवर अधिक भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून नागरीकांनीही सतर्क राहण्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.
शहराच्या विविध भागात चोरीचे सत्र सुरूच
शहरात काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे नागरी वसाहतीमधील बंद घरे तर दुकानांना टार्गेट करीत आहेत. जामनेर रोड वरील नाहाटा महाविद्यालय लगतचे दुकानांमध्ये तर वारंवार किरकोळ स्वरूपाच्या भुरट्या चोर्या नित्याच्याच झाल्या आहेत.मात्र चोरीच्या घटनांमध्ये किरकोळ स्वरूपाची रक्कम जात असल्याने दुकानदार पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळतात.यामूळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.
चोरीची एकच पद्धत
जामनेर रोडवरील चोरी एकाच पद्धतीने करण्यात आली असून चोरट्यांनी एक लहान मुलगा दुकानात जाईल अशा पद्धतीने दुकानाचा पत्रा कटरने मागील बाजूने कापला आहे.तसेच चोरट्यांनी दिवसा दुकानाची टेहळणी करून रविवारी रात्री आपले काम फत्ते केल्याचे उघडकीस आले.घटनास्थळी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पाहणी करून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली आहे.
एकाच दुकानातून जास्त रक्कम व माल लांबवला
जामनेर रोडवरील चार दुकानांपैकी प्रगती स्टेशनरी व जनरल स्टोअर्स मधून चोरट्यांनी महागडे स्प्रे बॉटल, तिन हजार रूपये रोख व इतर साहीत्य असा किमान 15 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.तर साई मेन्स पार्लर मधून होम थिएटर तिन हजार रूपये व दुकानात ठेवलेली दान पेटीचा समावेश आहे. इतर दुकानातूही किरकोळ स्वरूपाचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला असून दुकानाचा पत्रा कापला गेल्याने दुकानदारांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.
शहरात चोरीचे सत्र थांबेना
शहरात गेल्या काही दिवसापासुन चोरट्यांचा पावसाळी हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत आहे.मागील आठवड्यात महामार्गावरील माळी भवन लगतचे कार डेकोरटरचे व परीसरातील इतर चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती. यामध्ये पोलीसांनी शहरातीलच दोन संशयीतांना पकडले आहे.मात्र वारंवार होणार्या चोरीच्या घटनांमूळे चोरट्यांनी पोलीसांसमोर आव्हान उभे केले आहे.तर पोलीसांना चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यासाठी परीसरातील सीसीटिव्ही कॅमेर्यातील चित्रीकरणाचा आधार घ्यावा लागत आहे.
परीसरातील नागरीक अनभिज्ञ
जामनेर रोडवरील दुकाने मागील बाजूने कापण्यात आली असून या दुकानांचे मागील बाजूने नागरीकांची वसाहत आहे.मात्र रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानांचे पत्रे कटरच्या साह्याने कापत असतांना होणार्या आवाजापासून नागरीक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.चोरीची घटना किरकोळ स्वरूपाची दिसत असली तरी भविष्यात चोरटे मोठ्या स्वरूपाची चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामूळे पोलीसांप्रमाणे नागरीकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.