भुसावळात एकाच रात्री सहा दुकाने फोडली

0

शहरातील शांती नगरातील पुखराज प्लाझामधील घटना : तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला : वाढत्या चोर्‍यांनी व्यापारी धास्तावले

भुसावळ : जुन्या चोर्‍यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच नव्याने होणार्‍या चोर्‍या नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील गजबजलेल्या शांती नगर भागातील पुखराज प्लाझा संकुलासह लगतची तब्बल सहा दुकाने फोडल्याची तर तीन दुकानांना फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने व्यापारीवर्ग धास्तावला असून पोलिसांच्या कार्यपद्धत्तीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.

शटर वाकवत दुकाने फोडली
शहरातील शांती नगरातील पुखराज प्लाझा अपार्टमेंटखाली व परीसरात असलेल्या तब्बल सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले तर तीन दुकानांचे कुलूप न फुटल्याने रोकड शिल्लक राहिली. सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर व्यापारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली. व्यावसायीकांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठत पोलिसांना झालेल्या चोरीची माहिती दिली. डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोेंबे, हवालदार सय्यद वली, चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासह डीबी पथकातील पोलिसांनी घटनास्थळी जात पंचमाना केला.

एकाच रात्रीत सहा दुकाने टार्गेट
पुखराज प्लाझा या संकुलातील भास्कर कोळी यांच्या मालकीच्या दत्त डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाचशे रुपयांची चिल्लर लांबवली तसेच एक किलो पेढाही फस्त केला. यावर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला.व्यापारी संकुलातील कमलेश चंदन यांच्या प्रथमेश बेकरी या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडत दुकानात प्रवेश करीत पाच हजारांची रोकड लांबवत साहित्य अस्ताव्यस्त केले तसेच खाण्याच्या साहित्यावरही हात साफ केला.सोहम अपार्टमेंटजवळील दुर्गादास झोपे यांच्या पालवी फॅशन या दुकानातील सुमारे 200 ते 300 रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लांबवली तसेच हेरंब अपार्टमेंटजवळ असलेल्या एस.आर्ट.फोटो स्टुडीओतून एक हजार पाचशे रुपये लांबवले. सहकार नगर परीसरातील कंचन किशोर वानखेडे यांच्या स्पॉलोन ब्युर्टी पार्लरच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील दोन हजार दोनशे रुपयांची रोकड लांबवली. पालिका कार्यालयाच्या समोर असलेल्या डॉ.महेश पांगळे यांच्या क्लिनीकचेही शटर वाकवून क्लीनिकम्ये प्रवेश करीत सुमारे दोन हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. यापूर्वीही डॉ. पांगळे यांच्याकडे दिवाळीच्या काळात चोरट्यांनी चोरी करून त्यावेळी 45 हजार रूपये लांबवले होते.

तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला
पाच दुकाने आणि एक क्लिनिकमध्ये चोरी करीत चोरट्यांनी व्यावसायीकांची झोप उडवून दिल्यानंतर पुखराज प्लाझा व्यापारी संकुलातील किोर चिंचोले यांच्या के.के. मेटल्सचे सेंट्रल लॉक न तुटल्याने येथे चोरी फसली तर बाजूलाच असलेल्या नंदू जोहरी यांच्या बालाजी लेडीज वेअर या दुकानाचेही सेट्रल लॉक तुटले नाही तसेच श्रध्दा जनरल या तुषार सरोदे यांच्या दुकानातील कुलूप न तुटल्याने चोरी टळली. दरम्यान, या प्रकरणी प्रथमेश बेकर्सचे कन्हैय्याला चंदन यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकानातून चोरट्यांनी चार हजारांची रोकड लांबवली तसेच तुषार सरोदे, किशोर चिंचोले, नंदू जोहरी, किशोर वानखेडे, राहुल वाणी, दुर्गादास झोपे यांच्याही दुकानात चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.