भुसावळ- तक्रार दिल्याचा राग आल्याने तक्रारदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला करीत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवार, 24 जानेवारी रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल दिव्येशपासून काही अंतरावर घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघा पसार आरोपींच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या आहेत. मयूर अरुण कोलते (31, रा.प्रोफेसर कॉलनी, भुसावळ), कल्पेश दिलीप ढाके (24, रा.तुकाराम नगर, भुसावळ) व आकाश उर्फ गोलू सुभाष वारके (19, रा.प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हल्ल्याची पार्श्वभूमी अशी
भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांना विनाकारण शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर संजय चौधरी यांनीही नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध शिवीगाळ तसेच दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आपल्या वडिलांनी ही तक्रार दाखल केल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.अमरनाथ नगर भुसावळ) याने केली होती. मुन्ना चौधरीवर संशयीत आरोपींनी लोखंडी रॉडने व लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच अंगावर पेट्रोल ओतून डाव्या हाताच्या बरगडीवर तसेच दंडावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत पसार झाले होते.
गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
आरोपी सुंदर नगरच्या बाजूला सायली हॉटेलजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, एएसआय तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, अय्याज सैय्यद, पोलिस किशोर महाजन, रमण सुरळकर, अनिल पाटील, सुभान तडवी, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.