भुसावळात एटीएम फोडले ; हरीयाणातील संशयीत जाळ्यात

0

भुसावळ शहर पोलिसांनी अक्कलकुव्यातून तीन संशयीतांना घेतले ताब्यात ; आरोपींना न्यायालयाने सुनावणी चार दिवसांची कोठडी

भुसावळ- भुसावळसह धानोरा (ता.चोपडा) व किनगाव (ता.यावल) येथे चोरट्यांनी गतवर्षी रविवार, 14 जानेवारी रोजी पहाटेच गॅस कटरने एटीएम फोडून त्यातील सात लाख 52 हजार 200 रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला होता. वर्षभरापासून या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे काम सुरू असतानाच अक्कलकुवा येथे एटीएम फोडल्याप्रकरणी हरीयाणासह राजस्थानमधील संशयीत अटकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपींचा ताबा घेतला असून न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अत्यंत सराईत व धीट असलेल्या आरोपींकडून आता एटीएम चोरीचा उलगडा करण्याचे आव्हान शहर पोलिसांवर आहे.

दिड वर्षानंतर मिळाला धागादोरा
गतवर्षी 14 जानेवारी रोजी जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदीरासमोरील अ‍ॅक्सिस बॅकेचे एटीएम गॅस कटरद्वारे फोडून चोरट्यांनी त्यातून तीन लाख 14 हजार 100 रुपयांची रोकड लांबवली होती तर या प्रकरणी शहर पोलिसांनी तब्बल दिडवर्षानंतर अक्कलकुवा येथून तीन संशयीतांना अटक केली आहे. जुबेर नूर मोहंमद (रा. हरियाणा), सूरजपाल धर्मपाल भारद्वाज (रा.हरीयाणा) व रमजान अपू सफा (रा. भरतपूर, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही संशयीतांना चार दिवसांची अर्थात 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
अक्कलकुवा येथे देखील एटीएम फुटल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही संशयीत कारागृहात असतांना त्यांना अटक करण्याची परवानगी न्यायालयाकडून घेत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील, जितेद्र सोनवणे, भूषण चौधरी आदींच्या पथकाने अक्कलकुआ येथून कारागृहातील संशयीतांचा ताबा घेतला. निरीक्षक ठोंबे म्हणाले की, आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.