भुसावळ:- पालिकेच्या कर्मचार्याच्या हातातून लाखोंची रोकड लांबवण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी फसला. या घटनेसंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जामनेर रोडवरील हॉटेल रंगोलीजवळील जुन्या अग्निशमन केंद्रात विस्तारीत करभरणा कक्ष सुरू आहे.
कर भरणा कक्षातील पालिकेचे कर्मचारी अजय केदारे यांनी दिवसभरात वसूल झालेली तीन लाख 57 हजार रुपयांची रक्कम व कागदपत्रे, पावतीपुस्तक घेवून शनिवारी सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजेच्या दरम्यान या रक्कमेचा भरणा करण्यासाठी नवीन पालिका कार्यालय गाठत असतानाच पालिकेच्या प्रवेशव्दाराजवळच एका अनोळखी युवकाने अजय केदारे यांच्यावर हल्ला चढवत रोकड असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. केदारे यांनी रोकड असलेली पिशवी घट्ट पकडून, तत्काळ आरडाओरड केल्याने परीसरातील नागरिक धावले तर चोरटा मात्र पसार झाला.