काम न करणार्या स्वच्छता कर्मचार्यांसह आरोग्य निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा : आमदार संजय सावकारे यांच्या सूचना : भुसावळातील मिरवणूक मार्गावरील अंडर ग्राऊंड केबलच्या कामास आठ दिवसात होणार सुरूवात
भुसावळ : शहरात विविध समस्यांबाबत सत्ताधार्यांविषयी वाढत असलेल्या रोषानंतर आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेत पालिकेत शुक्रवारी दुपारी चार वाजता अचानक सरप्राईज व्हिजीट दिली. नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकार्यांची त्यांनी बैठक घेतली. याप्रसंगी सर्वाधिक तक्रारी स्वच्छतेसंदर्भात आढळल्यानंतर आमदार सावकारे यांनी सकाळी अचानक शहरातील विविध भागात मुख्याधिकार्यांनी भेटी द्याव्यात व गैरहजर असलेल्या कर्मचार्यांचे तातडीने निलंबन करावे तसेच संबंधित आरोग्य निरीक्षकासह मुकडदमावरही कारवाई करावी, अशा सूचना मुख्याधिकार्यांना केल्या. याप्रसंगी उपस्थित नगरसेवकांच्या अक्षरशः तक्रारीचा पाऊस पडला. दरम्यान, बैठकीत श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अंडरग्राऊंड केबलविषयी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता घोरूडे यांच्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्यानंतर येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करण्याचे अधिकार्यांनी आश्वासन दिले.
सत्ताधारी समस्या सोडवत नसल्याने आमदारांचा पुढाकार
शहरात सर्वत्र वाढलेली अस्वच्छता, रस्त्यांसह डेंग्यूचा बिकट बनलेला प्रश्न तसेच बंद पथदिव्यांविषयी वाढलेल्या समस्यांमुळे शहरवासी हैराण झाले आहेत तर त्याचा रोष स्थानिक नगरसेवकांवर नागरीक काढत असल्याने नगरसेवकांनी आमदारांकडे या संदर्भात व्यथा मांडल्या होत्या. दोन महिने उलटूनही पालिकेची सर्वसाधारण सभा लांबल्याने व रस्त्यांबाबत सर्वाधिक रोष वाढल्याने तसेच शहरातील विविध प्रभागातील बंद असलेले पथदिवे व मुख्य मार्गावरील बंद स्ट्रीट लाईट, तुंबलेल्या गटारी व प्रभागातील वाढलेली अस्वच्छता, नादुरुस्त रस्ते आदी समस्या सुटत नसल्याने आमदारांनी शुक्रवारी दुपारी अचानक पालिका गाठली. अचानक आलेले आमदार पाहून अधिकार्यांना घामही फूटला. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी त्यांचे स्वागत केले. नगराध्यक्ष पालिकेत नसल्याने त्यांना दूरध्वनी करून तातडीने बोलावण्यात आले. यावेळी नगरसेवकांनी विविध समस्या मांडल्यानंतर या समस्या 15 दिवसांच्या आत सुटाव्यात, अशा सूचना आमदारांनी केल्या तर मुख्याधिकार्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना तातडीने समस्यांची दखल घेण्याचे आदेश दिले.
स्वच्छता कर्मचारी गैरहजर आढळल्यास होणार निलंबन
शहरात डेंग्यूने थैमान माजवल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर अस्वच्छतेविषयीदेखील सर्वच नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या. यावेळी आमदारांनी शहरातील चारही स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेतली. सफाई कर्मचार्यांची तुम्ही हजेरी घेतात का ? प्रश्नावर चारही निरीक्षकांनी होकारार्थी मान हलवल्यावर आमदारांनी संतप्त होत आधी तुम्हाला निलंबित करायला हवे, असे सांगत मुख्याधिकार्यांनी अचानक पहाटे सरप्राईज व्हिजीट करावी व जे सफाई कर्मचारी गैरहजर आढळले त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी सूचना आमदारांनी केली. यावेळी मुख्याधिकार्यांनी शुक्रवारी सकाळी दगडी पुलाजवळ भेट दिली असता अवघे चार कर्मचारी आढळल्याची माहिती दिली.
स्वच्छता कर्मचारी येतात केवळ ‘दिवाळीत’
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी आपल्या प्रभागात कर्मचारी येत नसल्याने आपण स्वतः स्वखर्चाने सहा कर्मचारी नेमल्याचे सांगितले तर नगरसेवक अमोल इंगळे यांनीदेखील स्वच्छता कर्मचारी केवळ दिवाळी आल्यानंतर उगवतात, असा आरोप केला. नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनीदेखील आपल्या प्रभागात कर्मचारी न आल्यास त्यांचा पगार अदा करू नये, असे सांगितले तर अन्य नगरसेवकांनी स्वच्छता कर्मचार्यांविषयी रोष व्यक्त केला. काही नगरसेवकांनी तर स्वच्छता कर्मचार्यांऐवजी दुसरेच कर्मचारी काम करीत असल्याचे सांगितले तर काही खाजगी रुग्णालयात व अन्य ठिकाणी काम करीत असल्याची तक्रारही दिनेश नेमाडे यांनी केली. मुख्याधिकार्यांनी या संदर्भात कारवाईचे आश्वासन दिले. कचरा उचलण्यासाठी एका चाकाची गाडी असलीतरी ती गैरसोयीची असल्याने दोन चाकाची गाडी असावी, असेही मत मांडण्यात आले. यावेळी नगराध्यक्षांनी स्वच्छता कर्मचारी प्रभागात आला नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी केल्यानंतर त्या सफाई कर्मचार्याचा त्या दिवसाचा पगार कट करावा, अशा सूचना केल्या.
तर नगरसेवक पदाचा राजीनामा देईल
शहरातील जामनेर रोड, यावल रोड, वरणगाव रोड भागातील अनेक स्ट्रीट लाईट बंद असल्याची तक्रार नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दिली. या संदर्भात इलेक्ट्रीक अभियंता सुरज नारखेडे यांना बोलावल्यानंतर त्यांनी केबलमध्ये पाणी गेल्याने व रस्त्यावरून वाहने धावत असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगताच आमदारांनी संतप्त होत नारखेडे यांची झपाई करीत निकृष्ट काम झाल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले. यावेळी कोठारीदेखील संतप्त झाले, दिड कोटी खर्चून ही कामे झाली आहेत, नागरीकांनी आम्हाला कशाला निवडून दिले आहे? असे प्रश्न त्यांनी करताच नगराध्यक्षांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यातही तु तु मैं मैं झाली. कोठारी यांनी डान्सिंग स्ट्रीट लाईटचा व्हिडिओ नागरीक आपल्याला पाठवतात, असे सांगत तसे होत नसल्यास आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देवू व यापुढे निवडणूक लढवणार नाही, असे आव्हानच नगराध्यक्षांना देत निकृष्ट काम झाल्याच्या मुद्यावर बोट ठेवला तर अन्य नगरसेवकांनीही या मुद्यावर सहमती दर्शवली.
एलईडीसह कराबाबतही नगरसेवकांच्या तक्रारी
शासनाच्या ईएसएल कंपनीतर्फे करार पद्धत्तीने शहरात ठिकठिकाणी एलईडी लाईट बसवण्यात आले आहेत मात्र तक्रारी करूनही ठेकेदार दखल घेत नाही, उद्धट भाषा वापरतात, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. यावेळी आमदारांनी संतप्त कंपनीचे बिल थांबवण्याची सूचना केली तर संबंधिताला तातडीने बोलावून त्याची कानउघाडणी करण्याची सूचना मुख्याधिकार्यांना केली. यावेळी शहरातील 25 टक्के मालमत्तांना अद्याप कर लागला नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. याबाबतही दखल घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, नगरसेवक प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, मुकेश पाटील, निक्की बत्रा, अजय नागराणी, किशोर पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, बापू महाजन, सतीश सपकाळे, शफी पहेलवान, सी.ए.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, वसंत पाटील, रमेश मकासरे, लक्ष्मी मकासरे, दिनेश नेमाडे आदींची उपस्थिती होती.