हैद्राबादच्या पथकाने शहरातील स्वच्छतेसह स्वच्छतागृहांची केली गोपनीय पाहणी ; अहवाल गुलदस्त्यात ;जानेवारी महिन्यात तीन दिवस झाले सर्वेक्षण ; सर्वेक्षणाबाबत पालिका अनभिज्ञ
भुसावळ- केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 500 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण केले जात असून या शहरांमध्ये भुसावळचाही समावेश आहे. सर्वेक्षणासाठी हैद्राबादच्या कार्वी कंपनीला ठेका देण्यात आले असून या पथकाच्या सदस्यांनी जानेवारी महिन्यात 4 ते 6 दरम्यान शहरातील स्वच्छतेसह स्वच्छतागृहाची पाहणी केली. विशेष म्हणजे पालिका प्रशासन व सत्ताधार्यांना याबाबत यावेळी माहितीच कळाली नाही तर या पथकाला सर्वेक्षणाची माहिती देणे बंधनकारक नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
नागरीकांच्या हाती 500 गुण
स्वच्छ सर्वेक्षणात दोन हजार गुणांची परीक्षा घेतली जात असून त्यापैकी 900 गुण पालिका प्रशासनाच्या रेकॉर्डला तर 600 गुण स्थळ पाहणीला तसेच 500 गुण नागरीकांनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहेत. शहरातील स्वच्छेतच्या प्रश्नी आता पालिकेला दोन हजार पैकी किती गुण मिळतील? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
शहरात बर्यापैकी सुधारणा
सुमारे दोन वर्षांपूर्वी देशभरात सर्वात अस्वच्छ शहरात क्रमांक दोनचे शहर म्हणून भुसावळचा क्रमांक आल्यानंतर पालिका प्रशासन व सत्ताधार्यांनी शहरात आमुलाग्र बदल घडवले होते. सार्वजनिक स्वच्छतेसह जागोजागी कचराकुंड्या तसेच प्रभागात कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. काही भागात अद्यापही घंटागाड्या फिरकत नसल्याचे तसेच कचरा उचलला जात नसल्याची ओरड असलीतरी लवकरच याही समस्या सोडवण्यावर भर राहणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.
गुणांवर मिळणार अनुदान
केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्याबाबत नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात गत महिन्यात भुसावळात पथक येवून गेले तर पालिकेला मिळालेल्या गुणांवरच शहरासाठी केंद्राकडून मिळणारे प्रोत्साहन अनुदान उपलब्ध होणार आहे. पालिकेने शहरात वैयक्तीक शौचालय नसलेल्या कुटूंबीयांचे सर्वेक्षण करून हजारो कुटूंबांना वैयक्तीक शौचालयाचा लाभ दिला आहे. यासाठी 17 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण पाहणीचा अहवाल लवकरच जाहीर होणार आहे तर शहरांबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत भुसावळ शहराची स्पर्धा होणार असून या स्पर्धेत शहर कितपत यशस्वी ठरणार? याची उत्सुकता आता भुसावळकरांनाही राहणार आहे.
पालिकेला कळवणे बंधनकारक नाही
स्वच्छ सर्वेक्षणासाठी आलेल्या समितीने पालिकेला सर्वेबाबत माहिती देणे बंधनकारक नाही त्यामुळे परस्पर सर्वेक्षण केले असावे, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. पथकाने नेमकी कुठे-कुठे पाहणी केली हे सांगता येणार नाही, असे नगराध्यक्ष यांनी सांगून शहरात स्वच्छतेबाबतीत बर्यापैकी सुधारणा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.