भुसावळ शहरात चोरटे मुक्कामी : चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा कुचकामी
भुसावळ : जुन्या चोर्यांचा तपास लागत नसताना दररोज होणार्या चोर्यांमुळे व्यावसायीकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांच्या गस्तीनंतरही चोरट्यांचा उच्छाद कायम असल्याने पोलिसांनी गस्त वाढवण्यासह गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गुरुवारी पहाटे चोरटे शहर पोलिस ठाणे हद्दीत हुंडाई कंपनीच्या शोरूसह गॅरेज व टाईल्स दुकान फोडल्याने शहरात खळबळ उडाली. सुदैवाने दोघा चोरट्यांची छबी सीसीटीव्ळी फुटेजमध्ये कैद झाल्याने फुटेजच्या आधारावर शहर पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन दुकाने फोडल्याने घबराट
जळगाव रोडवरील अण्णा अलॉयमेंट अॅण्ड बॅलेसिंग सेंटरचा पत्रा वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला खरा मात्र दुकानात लांबवण्यासारखे काहीही नसल्याने त्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान केले तसेच गाड्यांच्या कामासाठी लागणारे पान्हे लांबवले शिवाय तेथील एलसीडी टीव्ही बाहेर फेकून त्यांचे नुकसान केले. या घटनेत दुकानदाराचे सुमारे 10 हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी हुंडाई कंपनीच्या शोरूममध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोघा सीसीटीव्हीचे नुकसान करीत खिडकी कापून चोरट्यांनी आत प्रवेश करीत सामानाची फेकाफेक केली व संगणकाचे दोन मॉनेटरचे नुकसान केला शिवाय सीपीयु लांबवला. यानंतर एका टाईल्सच्या दुकानात सुध्दा चोरट्यांनी मागील बाजूचे पत्रे वाकवून आत प्रवेश करीत साहित्याची फेकाफेक केली मात्र त्याबाबत दुकानदारांनी तक्रार दिली नसल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही चोरटे कैद
जळगाव रोडवरील अण्णा अलॉयमेंट अॅण्ड बॅलेसिंग सेंटरचा पत्रा वाकवताना दोन 18 ते 20 वयोगटातील चोरट्यांची छवी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी अण्णा यांच्या दुकानातही चोरी झाली होती व त्यावेळीदेखील दोनशे रुपये रोकड लांबवण्यात आली होती. दरम्यान, शहरात पोलिसांची गस्त होत असलीतरी त्यात वाढ होण्याची आवश्यकता असून पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.