भुसावळात कॅरीबॅग बाळगणार्‍यांवर कारवाई

0

नगरपालिकेच्या धडक मोहिमेने खळबळ : पहिल्या दिवशी 15 हजार दंड वसुल

भुसावळ : प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक कंटेनर वापरण्यास बंदी असली तरी नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याने तसेच शहरातील नाल्यांमध्ये तसेच गटारींमध्ये कॅरीबॅगमुळे कचरा तुंबण्याचे प्रकार वाढल्याने नूतन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी प्लॅस्टीक कॅरीबॅग विक्री करणार्‍यांसह त्यांचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध गुरुवारपासून कारवाईचा इशारा दिला होता. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तीन व्यावसायीकांकडून पंधरा हजारांचा दंड वसुल करण्यात आला असून या कारवाईचा व्यापार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

पहिल्या दिवशी 15 हजारांचा दंड वसुल
पालिकेच्या विशेष पथकाने शहरातील नसरवांजी फाईल भागातील न्यू डिसुझा बेकरी चालकासह बाजार वॉर्डातील मुंजोबा साडी सेंटरसह शहरातील अमर किराणा सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त करीत संबंधित दुकानदारांना प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे एकूण 15 हजारांचा दंड वसुल केला. पालिकेचे पथक कारवाईसाठी आल्याची कुणकुण लागताच अनेक व्यापार्‍यांनी दुकानातील कॅरीबॅग अन्यत्र हलवल्या.

यांचा मोहिमेत सहभाग
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने विशेष पथक नियुक्त केले असून या पथकात प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पुरूषोत्तम पाटील, आरोग्य निरीक्षक वसंत राठोड, प्रदीप पवार, लिपिक संजय सुरवाडे, पोपट संसारे, सतीश बेदरकर, राजू टाक, धर्मेंद्र खरारे यांचा सहभाग होता.

नागरीकांनी कापडी पिशव्या वापराव्यात
बाजारात जाताना नागरीकांनी कापशी पिशव्या वापराव्यात तसेच दुकानदारालाही कॅरीबॅगसाठी आग्रह धरू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. प्लॅस्टीक कॅरीबॅगच्या अतिवापरामुळे शहरातील नाल्यांसह गटारी तुंबल्या आहेत शिवाय पाण्याचा प्रवाह अडून राहत असल्याने तुंबलेले पाणी गटारीबाहेर येवून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवू पाहत आहे.