मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांची पत्रकार परीषदेत माहिती : भुसावळसह खंडवा व बर्हाणपूर रेल्वे स्थानकाची केली पाहणी
भुसावळ : भुसावळातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवल्यानंतर नियोजित जागेवर एलएचबी कोचेस फॅक्टरीला नव्हे तर मेमू ट्रेन सेक्शन (मेन्टेनन्स सेक्शन) ला मंजुरी मिळाली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांनी भुसावळातील पत्रकार परीषदेत दिली. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भुसावळात मेमू ट्रेन सुरू होण्याची आशा त्यांनी वर्तवत 119 कोटींच्या मेन्टनन्स शेडला मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगत एलएचलबी कोचेस फॅक्टरीबाबत तत्कालीन जीएम यांनी दिलेल्या माहितीविषयी अधिक बोलण्याचे टाळले. दरम्यान, जीएम मित्तल यांनी शुक्रवारी दिवसभर खंडवा, बर्हाणपूर, रावेर तसेच सायंकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणी करून विविध कामांचे उद्घाटनही केले. यावेळी खंडवा ते नेपानगर दरम्यान जीएम स्पेशलची ताशी 120 किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आली व निरीक्षणही नोंदवण्यात आले.
खंडव्यासह, बर्हाणपूर व रावेरात भेट
रावेर- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी रावेर रेल्वे स्थानकावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचा विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी सत्कार केला. स्टेशन अधीक्षक यांनी महाव्यवस्थापक संजय मित्तल व डीआरएम विवेककुमार गुप्ता यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी नवीन बांधलेल्या कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केली. पाण्याच्या जलकुंभाचे गँगमन राहुल कोंगे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्मचार्यांच्या सोयी-सुविधा संदर्भात विचारपूस करून अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, अमोल पाटील, विशाल पाटील, चंद्रकांत चौधरी, उमेश महाजन, प्रवासी संघटनेचे प्रशांत बोरकर, शशांक बोरकर, स्वप्निल पाटील यांच्या सह अप-डाउन करणार्या प्रवाशांनी विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. मित्तल यांनी कर्मचारी निवासस्थान, सायकल स्टॅण्ड व विद्यार्थी यांच्या योगाची पाहणी केली तसेच वेटिंग हॉल, वृक्षारोपण मोहीम, महिला व पुरुष प्रतीक्षालय तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालयाचे उद्घाटन केले. प्रसंगी एका गँगमनने निकृष्ट कामासंदर्भात तक्रार केल्यानंतर डीआरएम यांना दखल घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. पत्रकार परीषदेला डीआरएम विवेककुमार गुप्ता, पीआरओ शिवाजी सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बर्हाणपूरसह खंडव्यातही भेट
शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास मित्तल यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर आगमन झाल्यानंतर भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर डीआरएम स्पेशल ट्रेन खंडव्याकडे रवाना झाली. खंडवा रेल्वे स्थानकावरील टीटी लॉबीसह लोकोपायलट लॉबीचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांनी नवीन पुलाचे निरीक्षण केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्यांचे उद्घाटन केले तसेच राजभाषा व सुरक्षा व अन्य विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर जीएम यांनी दुपारी बर्हाणपूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
भुसावळातील एलएचबी फॅक्टरीला वाटाण्याच्या अक्षता
भुसावळातील रेल्वेच्या जागेवरील गेल्या अनेक वर्षांचे अतिक्रमण उटवण्यात आल्यानंतर अनेकांना बेघर होण्याची वेळ आली होती तर या जागेवर एलएचबी कोचेस फॅक्टरी येणार असल्याचे सांगून स्थानिकांना रोजगार देण्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते मात्र भुसावळातील पत्रपरीषदेत जीएम मित्तल यांनी भुसावळात 25 रॅकचा मेमू ट्रेन दुरुस्ती (मेन्टनन्स शेड) होणार असल्याचे सांगून त्यासाठी 119 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचे सांगितले. एलएचबी कोच फॅक्टरीचा निर्णय आपल्या अखत्यारीतील नसल्याचे सांगून त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कोर्टात चेंडू ढकलला.
चोर्या होतातच मात्र प्रभावी उपाययोजना
रेल्वे प्रवासात डीआरएम यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेल्याबाबत जीएम यांना छेडल्यानंतर रेल्वेत गुन्हेगारी वाढली असल्याचे मान्य करीत त्याबाबत प्रभावी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगून प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्लॅटफार्म क्रमांक एक ते तीनवर जाण्यासाठी असलेली लिप्ट गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा प्रश्न विचारल्यानंतर गर्डरची उभारणी सुरू असून मार्चअखेर हा प्रश्न सुटेल, असे आश्वासन देण्यात आले. सुरत पॅसेंजरला दोन स्लीपर कोचेस लावण्यासंदर्भात माहिती घेणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले तर मनमाड-मुंबई धावणारी राज्यराणी भुसावळऐवजी आता जालन्याहून धावणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला माहिती देताना सांगितले. दरवेळा पॅसेंजरच रद्द का होतात? या प्रश्नाला उत्तर देताना कुठल्याही नवीन गाडीसाठी पॅसेंजर रद्द केल्या जात नाहीत, तांत्रिक कामांसाठी त्या रद्द होतात, असे उर देण्यात आले. रेल्वेचे बंद म्युझियम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही डीआरएम यांनी दिली. रेल्वे रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसवण्याबाबत माहिती घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
फेब्रुवारीपासून भुसावळातही मेमू ट्रेन धावणार
भुसावळात मेमू ट्रेन आल्यानंतरही त्यांचे संचलन का होत नाही? या प्रश्नावर जीएम यांनी नागपूर-अमरावती मेमू सुरू झाली असून लोकोपायलट यांच्या कमतरतेमुळे भुसावळ विभागात अडचण असल्याचे सांगून 26 जानेवारी रोजी लोकोपायलट यांचे प्रशिक्षण संपत असल्याने त्याच्या महिनाभरानंतर अर्थात फेब्रुवारीपर्यंत भुसावळ विभागातून मेमू ट्रेन धावणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
भुसावळात आता तीन मिनिटात भरले जाणार रेल्वेत पाणी
शुक्रवारी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर जीएम स्पेशल ट्रेनचे आगमन झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे मित्तल यांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी क्रु लॉबीला त्यांनी भेट दिली तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या एसी वेटींग रूमची पाहणी केली व प्लॅटफार्म क्रमांक 3 व 4 च्या मध्यभागी असलेल्या उद्यानाचे उद्घाटन केले. त्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेरील उद्यानांत कारंजाचे उद्घाटन केल्यानंतर पे अॅण्ड युज तत्वावरील शौचालय बांधकामाच्या कामाचे त्यांनी भूमिपूजन केले व त्यानंतर रेल्वेच्या गांडूळ खत विभागानजीक असलेल्या क्वीक वॉटर स्टिस्टीमचे उद्घाटन केले. यापूर्वी रेल्वेत पाणी भरण्यासाठी 10 मिनिटांचा अवधी लागत होता तो आता अवघा तीन मिनिट लागणार असल्याने गाड्यांचा हॉल्ट कमी होवून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.