भुसावळात कोम्बिंग : अट्टल शेरू ईराणी पोलिसांच्या जाळ्यात

0

आरोपीचा अकोला पोलिसांनी घेतला ताबा : चार संशयीत ताब्यात

भुसावळ- शहरात धूम स्टाईल वाढलेल्या चैन चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी ईराणी वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांनी शेख उर्फ शेरू सल्तनत इराणी यास अटक केली तर आरोपीचा अकोल्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यास अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर अन्य चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले मात्र त्यांचा कुठल्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात वाढल्या चैन चोरीच्या घटना
भुसावळातील गडकरी नगरातील विवाहिता चारूशीला विसे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईल चोरट्यांनी लांबवले होते तर जिल्हाभरातही अशाच पद्धत्तीने काही घटना घडल्यानंतर त्यातील काही संशयीताबाबत पोलिसांना सुगावा लागल्याने रविवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग राबवले. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, सहायक फौजदार अंबादास पाथरवट, आनंदसिंग पाटील यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, आरसीपी प्लॉटूनसह कर्मचार्‍यांनी कोम्बिंगमध्ये सहभाग घेतला.

अट्टल शेरू अली अकोला पोलिसांच्या ताब्यात
अकोला येथे घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात हवा असलेला आरोपी शेख सल्तनत इराणी (वय 24, रा. पापा नगर, भुसावळ) यास कोम्बिंगमध्ये पकडल्यानंतर त्यास रविवारी सकाळी अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर पापा नगरातून मोहंमद उर्फ बंग फिरोजअली इराणी (20), अब्बासअली नियाजअली (19), मोहसीन फिरोजअली इराणी (वय 28), मुस्तफा अली अक्तरअली (वय 19) यांना ताब्यात घेण्यात आले मात्र त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.