भुसावळात कोम्बिंग : तीन तलवारींसह आरोपी जाळ्यात

गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ : 20 जणांना बजावल्या शहरबंदीच्या नोटीसा ; समन्ससह वॉरंटचीही बजावणी

भुसावळ : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार भुसावळ शहरातील शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी धडक कोम्बिंग ऑपरेशन राबवत हद्दपार आरोपीसह अन्य एका आरोपीच्या मुसक्या आवळत तीन तलवार जप्त केल्या. पोलिसांनी 23 समन्स बजावणासह सहा बेलेबल वारंटची बजावणी केली तसेच तीन नॉन बेलेबल वॉरंट बजावणी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

यांचा कारवाईत सहभाग
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठ पेठचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला व पोलीस कर्मचारी कोम्बिंगमध्ये सहभागी झाले. मंगळवारी रात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी रात्री सर्चिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात पोलिसांना हद्दपार संशयीत तपासणी करणे, पाहिजे असलेले संशयीत तपासणी करणे, रात्री संशयीतरित्या फिरत असणार्‍यांची सखोल चौकशी करणे, समन्स, वॉरंट बजाविण्यासाठी पोलीस संबंधितांच्या घरी जातात मात्र ते मिळून येत नाही अशांना समन्स बजावणे आदी सूचना करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी त्याचप्रमाणे भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी केली.

हद्दपार आरोपीसह दोघांना अटक
पोलिसांनी 18 हद्दपार व्यक्तींच्या घरी जावून तपासणी केली असता त्यात बाजारपेठ पोलिसांना हद्दपार करण्यात आलेला हेमंत पैठणकर हा महाराणा प्रताप शाळेच्या बाजूला त्याच्या राहत्या घरी दिसून आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व कलम 142, 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्या घरातून पोलिसांनी एक तलवार जप्त करण्यात आली. दुसरी कारवाई शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी गरीब नवाज मशीदीसमोर वास्तव्यास असलेल्या शाहिद शेख पिंजारी याच्यावर करण्यात आली. संशयीताच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. पिंजारीविरूध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वॉण्टेड आरोपी जाळ्यात
कोम्बिंगमध्ये पोलिसांना हवा असलेला व पाटील मळ्यातील रहिवासी संशयीत राहुल नेहेते याला पोस्कोच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली तर शहर पोलिसांना हव्या असलेल्या संशयीतास भादंवि 307 च्या गुन्ह्यातील संशयीतासदेखील ताब्यात घेण्यात आले. रात्री अवैध दारूविक्री प्रकरणी चार गुन्हे वेगवेगळे दाखल करण्यात आले तर शहर बंदी करण्यात आलेल्या 20 जणांना नोटीसांची अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान, नाकाबंदी दरम्यान 61 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात एका वाहनावर नंबर नसल्याने तसेच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले. 34 हिस्ट्री सीटर पैकी 21 जणांना पोलिसांनी चांगल्या वर्तनाची समज देण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.