भुसावळात कोम्बिंग ; दोन तलवारींसह चार संशयीत जाळ्यात

0

विना क्रमांकाच्या नऊ दुचाकी जप्त ; गुन्हेगारांच्या घराची रात्रभर झाडाझडती

भुसावळ- शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रात्रभर शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. तलवार बाळगणार्‍या दोघांना अटक करण्यात आली तर चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तसेच विना क्रमांकाच्या नऊ व अन्य दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

तलवारीसह चार संशयीतांना अटक
कोम्बिंगमध्ये पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांना अटक केली तर दोन तलवारी बाळगणार्‍यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या शेख रहेमान शेख कालू (26, काझी प्लॉट, भुसावळ) व शेख रईस शेख रफिक (32, मटण मार्केटजवळ, नसरवांजी फाईल, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरुद्ध वाल्मीक सोनवणे व सुधीर विसपुते यांनी फिर्याद दिली तर तलवार बाळगणार्‍या अब्बास ईबादतअली (18, पापा नगर, भुसावळ) व शेरूअली सल्तनतअली (23, इराणी मोहल्ला, पापा नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध विजय पाटील व विकास सातदिवे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या वॉरंटवरील पसार आरोपी हसन अली न्याज अली (ईराणी मोहल्ला, भुसावळ) यासदेखील अटक करण्यात आली.