भुसावळात कोम्बिंग : सात गायींची सुटका
कत्तलीच्या उद्देशाने गायी आणणार्या सात जणांविरोधात गुन्हा : 14 गायी मालकांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बजावली नोटीस
भुसावळ : बकरी ईदच्या दिवशी गुरांची कत्तल रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला, गौसीया नगर व मिल्लत नगर भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत सात गुरांची सुटका केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना या परीसरात 14 गुरे मालकांकडे 21 गोवंश जातीचे जनावरे आढळली असून पोलिसांनी संबंधित गुरे मालकांना भादंवि 149 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. बकरी ईदनंतरही पोलिसांकडून ही जनावरे तपासली (चेक) जाणार असून गुरे न आढळल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी गुरे मालकांना बजावले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
तीन पथकाद्वारे कोम्बिंग
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला, गौसीया नगर व मिल्लत नगर भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यासाठी पोलिसांच्या तीन स्वतंत्र टीम गठीत करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला व सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबी स्टाफ तसेच आरपीपी प्लाटून घेवून पोलिसांनी या भागात कोम्बिंग राबवूत घरांची झडती घेतली. यावेळी सात गुरे कत्तलीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे निदर्शनास येताच त्यांची सुटका करून या गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली.
14 गुरे मालकांना नोटीसा
कोम्बिंगदरम्यान 14 गुरे मालकांनी घराबाहेर 21 गोवंश बांधल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता ही पाळीव जनावरे असल्याचे गुरे मालकांनी सांगितल्यानंतर संबंधिताना 149 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या. बकरी ईद झाल्यानंतरही गुरांची तपासणी करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी बजावत त्यानंतर गुरे न दिसल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा यावेळी दिला.
सात जणांविरोधात गुन्हा दाखल
कत्तलीच्या उद्देशाने गुरे आणणार्या सात जणांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण खंडेराव देशमुख (30) यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सैय्यद निहाल सैय्यद जहीर (37), चाँद शहा हुसेन शहा (48), मोहम्मद आबीद अब्दुल सत्तार (42), मुसा फकिरा पिंजारी (50), अल्लाउद्दीन शेख शेरोद्दीन (43), आरीफखान शफीयारखान (42), शेख रफीक शेख कालू (50, सर्व रा.गौसीया नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.