भुसावळात क्रीडा संकुलाच्या हस्तांतरणावरून अधिकार्‍यांनी झटकले हात

0

भुसावळ: जुगादेवी रस्त्यावर तब्बल एक कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा संकुलाचा ताबा दोन वर्षानंतरही घेण्यात न आल्याने या क्रीडा संकुलाची रया गेली होती. शुक्रवारी आमदार संजय सावकारे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व अन्य अधिकार्‍यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी केली. मुळात सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या दोन वर्षांपासून या संकुलाचा ताबा घेण्यासंदर्भात जिल्हा क्रीडा विभागाशी पत्रव्यवहार करीत असताना ताबा घेण्यात आला नसल्याची बाब उघडकीस आली आहे तर या विभागाने मात्र याबाबत कानावर हात ठेवल्याने गुंता अधिक वाढला आहे. शुक्रवारच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग एका महिन्यात सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून ताबा क्रीडा विभागाला देण्यात येणार असल्याचे
सांगण्यात आले.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलाच नाही -क्रीडा अधिकारी
क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला नसल्याचे क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ठेकेदाराला 95 लाख अदा करण्यात आले आहेत. संकुलासह आवारातील प्रलंबित कामेपूर्ण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. पाच लाखांचे क्रीडा साहित्य आणण्यात येणार आहे.

ताबा घेण्यासंदर्भात दोन वर्षांपासून पाठपुरावा
दोन वर्षांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे संकुलाचा ताबा घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजयकुमार मौर्य यांनी दिली. ते म्हणाले की, शासनाने या विभागाला देखभाल-दुरुस्तीसाठी कर्मचारी देणे गरजेचे आहे. ठेकेदाराला फायनल बिल देण्यात आले आहे.